मुंबईचा भेदक मारा; अभिषेक नायर आणि शार्दूल ठाकूर यांचे प्रत्येकी २ बळी

मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर तामिळनाडूने रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत संथ सुरुवात केली. तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र पहिल्या दिवसअखेर त्यांना ६ बाद २६१ धावांची मजल मारली.

गंगा श्रीधर राजू आणि अभिनव मुकुंद यांनी ४५ धावांची सावध सुरुवात केली. यंदाच्या हंगामात अष्टपैलू योगदानासह संघाच्या विजयात निर्णायक योगदान देणाऱ्या अनुभवी अभिषेक नायरने पदार्पणवीर राजूला माघारी धाडले. त्याने १९ धावा केल्या. राजूच्या जागी आलेल्या कौशिक गांधीने मुकुंदला साथ देत धावफलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या अनुभवी मुकुंदला बलविंदर संधूने बाद केले. मुकुंदने ६ चौकारांसह ३८ धावांची खेळी केली. कौशिक आणि बाबा इंद्रजीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. आक्रमक पवित्र्यासह खेळणाऱ्या इंद्रजीतला शार्दूल ठाकूरने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ९ चौकारांसह ६४ धावा केल्या. दहा धावांच्या अंतरात कौशिकही परतल्याने तामिळनाडूचा संघ अडचणीत सापडला. नायरनेच त्याचा अडथळा दूर केला. ८ चौकारांच्या साह्याने त्याने अर्धशतकी खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या दिनेश कार्तिककडून तामिळनाडूला संयमी खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याने निराशा केली. शार्दूलने त्याला पायचीत पकडले. त्याला केवळ १० धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनीच्या कसोटी प्रकारातील निवृत्तीनंतर यष्टीरक्षकाच्या जागेसाठी कार्तिकचे नाव चर्चेत होते. यष्टीरक्षणाबरोबरच आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध कार्तिक तामिळनाडूचा आधारस्तंभ आहे. मात्र त्याला अपेक्षित खेळी करता आली नाही. कनिष्ठ वयोगट स्पर्धामध्ये दमदार प्रदर्शनानंतर गेल्या रणजी हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या बाबा अपराजित विजय गोहिलच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारच्या हाती झेल देऊन परतला. विजय शंकर आणि अश्विन क्रिस्त यांनी भागीदारी करत पडझड थांबवली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विजय ४१ तर अश्विन ९ धावांवर खेळत आहेत. मुंबईतर्फे शार्दूल ठाकूर आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. बलविंदर संधू आणि विकास गोहिल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. दरम्यान केव्हिन अल्मेडाच्या जागी संघात संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ याने रविवारी रणजी पदार्पण केले. तामिळनाडूची प्रथम फलंदाजी असल्याने पृथ्वीला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू : ९० षटकांत ६ बाद २६१ (बाबा इंद्रजीत ६४, कौशिक गांधी ५०; अभिषेक नायर २/५६, शार्दूल ठाकूर २/६४)

प्रियांक पांचाळची शतकी खेळी

नागपूर : यंदाच्या हंगामात दिमाखदार फॉर्ममध्ये असणाऱ्या प्रियांक पांचाळच्या शतकी खेळीच्या बळावर गुजरातने झारखंडविरुद्धच्या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत पहिल्या दिवसअखेर ३ बाद २८३ अशी मजल मारली.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विक्रमी त्रिशतकी खेळी साकारणारा समीत गोहेल आणि प्रियांक पांचाळ या बिनीच्या शिलेदारांनी ६२ धावांची आश्वासक सुरुवात केली. मात्र या भागीदारीत समीतचा वाटा अवघ्या १८ धावांचा होता. विकाश सिंगने समीतला विराट सिंगकडे झेल देण्यास भाग पाडले. ५६ चेंडूत १८ धावांची संथ खेळी करून प्रियांक माघारी परतला. भार्गव मेरईने प्रियांकला चांगली साथ देत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. विकाशनेच भार्गवला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ६ चौकारांसह ३९ धावांची वेगवान खेळी केली. पार्थिव पटेलने प्रियांकला साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान प्रियांकने यंदाच्या हंगामातील आणखी एक शतक पूर्ण केले. कौशल सिंगने पार्थिवला बाद करत झारखंडला यश मिळवून दिले. त्याने ६ चौकार आणि एका षटकारासह ६२ धावांची खेळी केली. प्रियांक दिवसअखेर २१ चौकारांसह १४४ धावांवर खेळत आहे