न्यूझीलंडमध्ये करोनाचा नवा एकही रूग्ण आढळला नसल्याने त्यांच्या सरकारने सोमवारी देशांतर्गत निर्बंध हटवण्याची घोषणा केली. सोमवारी न्यूझीलंडमधील शेवटच्या करोनाबाधित रूग्णाला पूर्णपणे बरे करून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता न्यूझीलंडमध्ये एकही करोनाबाधित किंवा संशयित रूग्ण नाही असे सरकारने स्पष्ट केले. न्यूझीलंडची ही कौतुकास्पद कामगिरी क्रिकेटपटू जिमी नीशम याने अभिमानाने सोशल मीडियावर शेअर केली. “करोनामुक्त न्यूझीलंड! सर्वांचे अभिनंदन… पुन्हा एकदा न्यूझीलंडवासीयांच्या नियोजन, दृढनिश्चय आणि सांघिक कामगिरी या गुणधर्मांचा विजय झाला आणि आपण करोनामुक्त झालो”, असे नीशमने ट्विट केले.

नीशमने केलेल्या ट्विटवर एका फॅनने त्याला खिजवण्यासारखा रिप्लाय दिला. “तुमच्या देशाची लोकसंख्या ४ मिलियन आहे. मुंबईची लोकसंख्या ही न्यूझीलंडपेक्षाही जास्त आहे, अशी एका फॅनने नीशमच्या ट्विटवर कमेंट केली. त्या रिप्लायवर नीशम चिडेल आणि आणखी काहीतरी बोलेल असे बहुतांश फॅन्सना वाटलं होते. पण नीशम एक अतिशय भन्नाट कमेंट करत या विषयावरच पडदा टाकला.

दरम्यान, करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत असून वैद्यकीय सहकार्यामुळे अनेक लोक करोनामुक्त झाले आहेत. करोनाचा फटका भारतीयांनाही बसला आहे. सुमारे तीन महिन्यांच्या लॉकडाउननंतर विविध ठिकाणी हळूहळू लॉकडाउनच्या अटी शिथील करून लोकांना घराबाहेर जाण्याची सशर्त मुभा देण्यात येत आहे.