मुंबई शहरच्या महिला संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरचे तर उपांत्य फेरीत बलाढय़ ठाण्याला हादरा दिला. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफच्या हुकूमी खेळाच्या बळावर पुण्याने रत्नागिरीचे आव्हान सहज नामशेष केले. त्यामुळे मुंबई शहर आणि  पुणे यांच्यात शनिवारी छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पध्रेच्या महिला विजेतेपदासाठी अस्मिता पणाला लागेल. पुरुषांच्या अंतिम सामन्यात ठाण्याची मुंबई उपनगरशी गाठ पडेल.
महाराष्ट्र शासन, कोल्हापूर कबड्डी असोसिएशन आणि डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट यांच्या यजमानपदाखाली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबई शहरने मध्यंतराला ७-५ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात डावी कोपरारक्षक सुवर्णा बारटक्केने अप्रतिम पकड करीत संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर उजवी कोपरारक्षक स्नेहल साळुंखेने ठाण्याची महत्त्वाची कबड्डीपटू अद्वैता मांगलेची पकड करीत गुणसंख्या वाढवली. त्यानंतर दुर्दैवाने पकड करण्याच्या प्रयत्नात आरती नार्वेकर बाद झाल्यामुळे एक गुण मुंबईकडून निसटला. परंतु अखेरीस मुंबईने सहज बाजी मारली.
दुसरा उपांत्य सामना प्रामुख्याने दीपिका जोसेफ विरुद्ध रत्नागिरीचा संघ यांच्यात होता. दीपिकाने प्रारंभीपासूनच गुण घेण्याचा सपाटा लावत रत्नागिरीचे क्षेत्ररक्षण खिळखिळे केले. रत्नागिरीवर चौथ्या मिनिटालाच पहिला लोण बसल्यानंतर त्यांनी नंतर डोके वर काढले नाही. पुण्याने चार लोण चढवत रत्नागिरीचा ४०-६ असा धुव्वा उडवला. दीपिकाला रेणुका तापकिरीची छान साथ लाभली.
पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबई शहरच्या मुंबईच्या अभिमन्यू चव्हाणने पहिल्याच चढाईत तीन गुण घेत आशा दाखवली. पण मुंबईचा भरवशाचा खेळाडू गौरव शेट्टीची चार वेळा पकड झाली, तर बाकीच्या खेळाडूंचेही काही चालले नाही. उजवा कोपरारक्षक प्रशांत चव्हाण आणि डावा कोपरारक्षक गिरीश इर्नाक ही ठाण्याची ताकद. या बळावर ठाण्याने दोन लोण चढवत मुंबईचा २४-६ असा आरामात पराभव केला. ठाण्याकडून चव्हाण आणि जीतेश जोशीने दमदार चढाया केल्या तर सुशील भोसलेने पोलादी पकडी केल्या. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने महेश डोईफोडे, रामचंद्र हलदर यांच्या शानदार खेळाच्या बळावर रत्नागिरीचा ११-५ अशा फरकाने पराभव केला.

कोल्हापूर-रत्नागिरीची ठस्सन!
कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्यातील महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आगळी ठस्सन पाहायला मिळाली. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये जिंकण्याची असीम ईर्षां पाहायला मिळाली. प्रेक्षागृहातून जशा यजमानांच्या संघाला टाळ्या मिळत होत्या, तशाच रत्नागिरीच्या खेळालाही दाद मिळाली. या सामन्यात एकूण तीन खेळाडूंच्या पायाला दुखापत झाली, यापैकी रत्नागिरीच्या स्मिता पांचाळ आणि कोल्हापूरच्या धनश्री मिठारी यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. यावरूनच या सामन्याची रंगत लक्षात येईल. अखेर १६-१५ अशा फक्त एका गुणाने रत्नागिरीने विजय मिळवत यजमान संघाचे आव्हान संपुष्टात आणले.
 
‘महिमा’ महिलादिनाचा!
महिलादिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पध्रेला सिनेअभिनेत्री महिमा चौधरी हिने आवर्जून भेट दिली. महिमाच्याच हस्ते कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याला प्रारंभ करण्यात आला. महिलादिनानिमित्त व्यासपीठावर आणि प्रेक्षागृहात पहिली रांग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. महिमाकडून आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल साळुंखे, गौरी वाडेकर, दीपिका जोसेफ आणि सुवर्णा बारटक्के यांचा सन्मान करण्यात आला.