ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आजवर आपण अनेक अविश्वसनीय झेल पाहिले आहेत. झटपट क्रिकेटच्या या सामन्यांत खेळाडूंच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा अनुभव घेण्याची पर्वणीच प्रेक्षकांना असते. असाच एक शानदार झेल सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यात पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंदच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने मोठा फटका मारला. मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या शेन वॉटसनने सीमारेषेच्या दिशेने चपळाईने धावत गेला आणि झेल टीपला. पण यावेळी त्याचे नियंत्रण सुटले. आपण सीमारेषेच्या बाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्याने चेंडू हवेत मागे उडवला. दरम्यान, मिड ऑफवर क्षेत्ररक्षण करत असलेला डेव्हिड वीसे देखील सीमारेषेजवळ पोहोचला होता. शेन वॉटसनने फेकलेला चेंडू वीजने झेप मारून पकडला. वीसेने जेव्हा झेल टीपला तेव्हा तो अगदी सीमारेषेच्या नजीक पोहोचला होता.
मैदानातील पंचांनी निर्णय देण्यासाठी तिसऱया पंचांची मदत घेतली. झेल योग्यरित्या टिपल्याचे पंचांच्या लक्षात आले आणि स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला.