विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात ऋषभ पंतचं स्थान अजुनही निश्चीत झालेलं नाहीये. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतला भारतीय संघात स्थान मिळालेलं आहे. आतापर्यंत पंतला आंतरराष्ट्रीय सामन्यात ज्या ज्या सामन्यांमध्ये संधी मिळाली, तिचा त्याने पुरेपूर वापर केला आहे. इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शतकी खेळी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. याच शतकामुळे आपल्या आत्मविश्वास भर पडल्याचं ऋषभने सांगितलंय, तो पीटीआयशी बोलत होता.

अवश्य वाचा – मोरे यांचे मार्गदर्शन पंतसाठी उपयुक्त

“इंग्लंडमध्ये ज्यावेळी मी पहिल्यांदा शतक झळकावलं त्यावेळी माझ्यातला आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर गेला. त्यानंतर मी माझा खेळ अधिक कसा सुधारु शकेन याचा विचार करत राहिलो. याचाच फायदा मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाला.” ऋषभने आपल्या कामगिरीचं गुपित सांगितलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटी सामन्यात ऋषभ पंतने नाबाद 159 धावांची खेळी केली. आतापर्यंत 9 कसोटी सामन्यांमध्ये 21 वर्षीय ऋषभ पंतच्या नावावर 696 धावा जमा आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन विश्वचषकासाठीच्या संघात आपलं स्थान निश्चीत करण्याची संधी पंतजवळ आहे. 24 फेब्रुवारीपासून भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी दोन टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – कसोटी संघात संधी मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला – हनुमा विहारी