जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेला राफेल नदाल, भारताचे अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग (आयटीपीएल) स्पध्रेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुंबई, सिंगापूर, दुबई आणि बँकॉक या चार संघांचा या स्पध्रेत सहभाग असून, रविवारी संघमालकांच्या झालेल्या बैठकीमध्ये स्पध्रेचा तात्पुरता कार्यक्रम निश्चित करण्यात आला. दरम्यान, भारताचा अव्वल टेनिसपटू सोमदेव देववर्मन या स्पध्रेत सहभागी होत नसल्याचे समजते.
भारताचा आघाडीचा टेनिसपटू महेश भूपती यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग स्पध्रेला २८ नोव्हेंबरपासून सिंगापूरला प्रारंभ होत आहे, तर १४ डिसेंबरला दुबईमध्ये ही स्पर्धा संपेल. फ्रान्सचा गाएल मोनफिल्स, अमेरिकेचा महान टेनिसपटू पीट सॅम्प्रस, अग्रस्थानावरील माजी खेळाडू अ‍ॅना इव्हानोव्हिक, फॅब्रिक सॅन्टोरो हेसुद्धा मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला नोव्हाक जोकोव्हिकवर दुबईच्या आव्हानाची धुरा असेल. कॅरोलिन व्होझ्नियाकी, गोरान इव्हानसेव्हिक, जान्को टिपसारेव्हिक, नेनांद झिमोनिक, मॅलीक जझिरी आणि मार्टिना हिंगीस यांचा दुबईच्या संघात समावेश असेल.
याचप्रमाणे अँडी मरे, जो विल्फ्रेड त्सोंगा, व्हिक्टोरिया अझारेंका, डॅनियल नेस्टर, कार्लोस मोचा आणि कर्स्टन फ्लिपकेन्स बँकॉकचे प्रतिनिधित्व करतील. तसेच सेरेना विल्यम्स, आंद्रे आगासी, टॉमस बर्डीच, लेटॉन हेविट, ब्रुना सोआरीस, पॅट्रिक राफ्टर, डॅनीला हॅन्टुचोव्हा आणि निक क्रिगियोस यांचा सिंगापूरच्या संघात समावेश आहे.