अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या २० वर्षीय नाओमी ओसाकाने इतिहासाची नोंद केली आहे. अंतिम फेरीत नाओमीने अमेरिकेची आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा  ६-२, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव केला. कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका ही पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे.

उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्याच मार्गारेट की ची झुंज दोन सेटमध्ये मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. अंतिम सामन्याआधी सेरेनाविरुद्ध खेळण्याबद्दल प्रश्न विचारला असता नाओमीने, “हा सामना कठीण जाणार आहे याची मला खात्री आहे. पण मला सेरेनाविरुद्ध खेळायचच आहे. ती मला प्रचंड आवडते.” असं उत्तर दिलं होतं. प्रत्यक्ष सामन्यात सेरेनासमोर नाओमीचा निभाव लागेल असा अंदाज कोणीही बांधला नव्हता, मात्र सर्वांचे ठोकताळे खोटे ठरवत नाओमीने सेरेनाला धक्का देत आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर कोरली आहे.

नाओमी आणि सेरेना यांच्या वयामध्ये अंदाजे १६-१७ वर्षाचं अंतर आहे. सेरेनाने आपल्या कारकिर्दीत १९९९ साली पहिल्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं, यावेळी नाओमी ही अवघ्या १ वर्षाची होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात नाओमीने सेरेनाच्या अनुभवाचा आपल्या खेळावर अजिबात दबाव येऊ दिला नाही. सेरेनाच्या प्रत्येक फटक्यांना सफाईदारपणे उत्तर देत नाओमीने आपल्या पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आहे.