भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने ५० मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने ५० मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले.
३२ वर्षीय नारंगचे आता ९७१ गुण झाले आहेत. चीनच्या शेंगबो झाओने ८९६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. पिस्तूल विभागात जितूने १९२९ गुण मिळविले आहेत. दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे. गुरप्रित सिंगने २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे. गुरप्रितने अमेरिकेत नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतील ५० मीटर रायफल प्रोनमध्ये हा निकष पूर्ण केला आहे. नारंगने लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. दुखापती व खराब कामगिरीमुळे नारंग याला १० मीटर एअर रायफलमध्ये जागतिक स्पर्धाच्या मालिकेतील पहिल्या तीन स्पर्धामध्ये भाग घेता आला नव्हता. फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने ६२६.३ गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत १८५.८ गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.