स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कसोटीपटू नासिर जमशेदने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे, असे नासिरचे म्हणणे आहे.

जमशेदने आतापर्यंत दोन कसोटी, ४८ एकदिवसीय आणि १८ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

‘‘पीसीबी माझ्यावर अन्याय करत आहे. माझ्याविरुद्ध जबानी देण्यासाठी पीसीबी खेळाडूंवर दडपण आणत आहे. जर त्यांच्याकडे माझ्याविरोधात पुरावे आहेत तर मी त्यांना सर्वापुढे आव्हान द्यायला तयार आहे. या साऱ्या गोष्टींचा विपरीत परिणाम माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होत आहे,’’ असे जमशेद म्हणाला.

पीएसएलमध्ये स्पॉट फिक्सिंगबाबत आयसीसीने पीसीबीला सावध केले होते! -फ्लॅनगन

कराची : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) स्पॉट-फिक्सिंग होण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आधीच दिला होता, असा खुलासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाचे मुख्य अधिकारी सर रॉनी फ्लॅनगन यांनी केला.

लाहोर येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात स्पॉट-फिक्सिंगचा प्रकार घडला होता. मात्र इंग्लंडमधील राष्ट्रीय गुन्हे संस्थेच्या माहितीआधारे आम्ही पाकिस्तान क्रिकेट मंडळाला याविषयी सावध केले होते, असे फ्लॅनगन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी पीसीबीने शार्जिल खान, मोहम्मद इरफान, शाहझैब हसन, नासिर जमशेद आणि खलिद लतिफ यांचे निलंबन केले आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये पीसीबीने अष्टपैलू मोहम्मद नवाझवर दोन महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना नवाझशी ऑस्ट्रेलियाच्या एका बुकीने संपर्क साधला होता, अशी माहिती पुढे आल्यावर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.