पी. व्ही. सिंधू, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि बी. साईप्रणीत यांसारख्या हातावर मोजण्याइतक्या खेळाडूंनीच या वर्षांत सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंनी आपली कामगिरी न उंचावल्यास ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताचे आव्हान मर्यादित स्वरुपाचे राहील, असा इशारा भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी दिला आहे.

आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स आणि खेलोमोर यांच्यातर्फे मुंबईत आयोजित फुटबॉलच्या प्रचार-प्रसारासाठीच्या कार्यक्रमाकरिता गोपिचंद उपस्थित होते. यावेळी गेल्या काही महिन्यांतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीविषयी गोपिचंद म्हणाले, ‘‘सिंधू, सात्त्विक-चिराग आणि साईप्रणीत हे खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सहज पात्र होऊ शकतात. परंतु अन्य खेळाडूंनी आताच कामगिरी न उंचावल्यास त्यांचे ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते. त्यामुळे ऑलिम्पिकचे स्थान पक्के करण्यासाठी त्यांची आपापसातच स्पर्धा रंगणार आहे.’’

एप्रिल २०२०पर्यंत रंगणाऱ्या सर्व स्पर्धा या ऑलिम्पिक पात्रतेचा भाग असून पुरुष आणि महिला एकेरी गटात क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंत समावेश असणाऱ्यांनाच थेट पात्र होता येणार आहे. अन्य खेळाडूंना पात्रता फेरीचा अडथळा ओलांडणे अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे वर्षभरातील कामगिरीचा निष्कर्षही ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने मिळवलेल्या विजेतेपदानंतर भारताच्या एकाही खेळाडूला कोणत्याही स्पर्धेत एकेरीतील विजेतेपद मिळवता आलेले नाही. याविषयी गोपिचंद म्हणाले, ‘‘निश्चितच सिंधूकडून प्रत्येक स्पर्धेत आता विजेतेपदाचीच अपेक्षा केली जाते. परंतु ती एक अव्वल दर्जाची खेळाडू असून मोठय़ा स्पर्धामध्ये कशाप्रकारे खेळ उंचवावा, हे तिला ठाऊक आहे. त्याशिवाय सततच्या स्पर्धामुळे सिंधू आणि अन्य खेळाडूंचीही मानसिक आणि शारिरीक दमछाक होते आहे. त्यामुळे खेळाडूंनी एखाद्या स्पर्धेला किती गुण मिळणार आहेत, हे ओळखून त्यानुसार नियोजन करावे.’’

गोपिचंद हे त्यांच्या काळातील एकेरीतील सर्वोत्तम खेळाडू होते. बहुतांशी एकेरीतील खेळाडूंनाच प्रशिक्षण देणाऱ्या गोपिचंद यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही उत्तम कामगिरी करीत आहोत, असे सध्याची पुरुष दुहेरीतील आघाडीचे जोडीदार सात्त्विक-चिराग नेहमीच सांगतात. याविषयी गोपिचंद म्हणाले, ‘‘प्रत्येक स्पर्धेदरम्यान मला सात्त्विक-चिरागसोबत वेळ घालवणे शक्य होत नाही. परंतु जेव्हा मी एखाद्या स्पर्धेसाठी त्यांच्यासह असतो तेव्हा त्यांनी खेळात काय सुधारणा कराव्यात, हे सांगतो. याचप्रमाणे दुहेरीतील प्रशिक्षकांशी मी नेहमीच संवाद साधत सात्त्विक-चिराग यांना काय संदेश द्यावा, हे सुचवतो. परंतु सात्त्विक-चिराग यांची जोडी फार प्रगल्भ असून त्यांच्यामुळे भारताच्या दुहेरीत पदकाच्या आशा नक्कीच वाढल्या आहेत.’’

देशात दर्जेदार प्रशिक्षकांची वानवा!

आपल्या बॅडमिंटनपटूंना भविष्यात योग्य दिशा दाखवण्यासाठी दर्जेदार भारतीय प्रशिक्षकच नाहीत, अशी खंत गोपिचंद यांनी व्यक्त केली. ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून आपण नव्या प्रशिक्षकांचा शोध घेतलेला नाही. भारतात अनेक गुणवान खेळाडू आहेत. परंतु भविष्यात त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकच नसले तर, ते आपले दुर्दैव म्हणावे लागेल. मी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आहेच, परंतु बदलत्या काळानुसार आपण अधिकाधिक प्रशिक्षकांचा शोध घेतला पाहिजे,’’ असे गोपिचंद म्हणाले.