नाशिक येथे सुरू असलेल्या ६५व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत (१७ वर्षांखालील) मंगळवारी महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.

मुलांच्या सांघिक गटात महाराष्ट्राने सॅबर या प्रकारात सुवर्णपदक मिळवले, तर फॉईल आणि ई.पी. प्रकारात त्यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राने सांघिक प्रकारात १८ गुण मिळवले. वैयक्तिक गटात महाराष्ट्राने फॉईलमध्ये सुवर्णपदक आणि सॅबरमध्ये रौप्य व कांस्यपदकाची कमाई करून नऊ गुण मिळवले. त्यामुळे महाराष्ट्राच्या खात्यात एकंदर २७ गुण जमा झाल्याने त्यांनी विजेतेपद मिळवले. हरयाणा आणि मध्य प्रदेश यांना संयुक्तपणे (प्रत्येकी १३ गुण) दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या सांघिक गटात महाराष्ट्राने फॉईल आणि सॅबर प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर वैयक्तिक गटात महाराष्ट्राच्या वैदही लोढा आणि कशिश भराड यांनी अनुक्रमे फॉईल आणि सॅबरमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे महाराष्ट्राने सर्वाधिक ३८ गुण (सांघिक २६ + वैयक्तिक १२) मिळवून विजेतेपद मिळवले. गुजरात (२४ गुण) आणि मणिपूर (१३ गुण) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.