हरयाणाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीव रजपूतने एअर रायफल विभागात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा किताब मिळवत ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वर्चस्व गाजविले. त्याने हा किताब मिळविताना गगन नारंग, अंजली भागवत यांच्यावर मात केली.  शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत संजीवने अंतिम फेरीत ३१.७ गुण मिळविताना सत्येंद्र सिंग (सेनादल) याच्यावर मात केली. सत्येंद्रने २९.९ गुण मिळविले. महिलांच्या १० मीटर रायफलमध्ये मात्र चंडेला हिने सुवर्णपदकाची कमाई केली. तिने २०७.२ गुण मिळविले. लज्जा गोस्वामी (गुजरात) हिने रौप्यपदक तर के.सी.हेमा हिने कांस्यपदक पटकाविले.  पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सत्येंद्रसिंग याने विजेतेपद मिळविताना ४५४ गुणांची नोंद केली. या क्रीडाप्रकारात रजपूत याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. २५ मीटर सेंटर फायर पिस्तूलमध्ये सेनादलाच्या गुरप्रीतसिंग याने सोनेरी वेध घेताना ५८६ गुणांची नोंद केली. पेम्बा तमांग व समरेश जंग यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.