|| तुषार वैती

येत्या २९ ऑगस्ट रोजी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि वाद हे समीकरण आता नवे राहिलेले नाही. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या नियमांमध्ये अधिक पारदर्शकता आणत आणि विविध समित्यांऐवजी एकच समिती स्थापन करून पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. पण तरीही द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा याला डावलल्याबद्दल नवा वाद उफाळून आला. विशेष म्हणजे, भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने निवड समितीवर ताशेरे ओढले. त्यातच अर्जुन पुरस्कारासाठी प्रतिभावान बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्यानेही पुरस्कारांच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरवर्षी उद्भवणारे हे वाद संपुष्टात आणण्यासाठी काय पावले उचलता येतील, याविषयी माजी खेळाडूंनी तसेच पदाधिकाऱ्यांनी मांडलेली ही परखड मते.

धोरण पूर्वीपेक्षा पारदर्शक, पण..! – अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीचे धोरण पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक करण्यात आले आहेत. नवीन नियमांमुळे आता प्रत्येकाला पुरस्कार मिळण्याची आशा वाटू लागली आहे. आंतरराष्ट्रीय पदकांना किती गुण द्यायचे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना किंवा त्यांच्या प्रशिक्षकांना पुरस्कार द्यायचा की नाही, याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांना द्रोणाचार्य पुरस्कारासाठी मुद्दाम डावलण्यात आले आहे, असे मला वाटत नाही. ते सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत. पण जे या पुरस्कारासाठी योग्य होते, त्यांना देण्यात आला. जसपाल राणा यांना पुढील वेळी नक्कीच हा पुरस्कार मिळेल, असे मला वाटते. पुरस्कारांच्या निवड समितीत मीसुद्धा अनेक वेळा काम पाहिले आहे. त्यामुळे पुरस्कार विजेत्यांची निवड करणे किती कठीण असते, याचा मला अंदाज आहे. त्यावेळी जे योग्य वाटते, त्यानुसार आम्ही विजेत्यांची निवड करत असतो. यंदाच्या १२ जणांच्या निवड समितीत जगज्जेती बॉक्सर मेरी कोम हिला स्थान देण्याचा क्रीडा मंत्रालयाचा निर्णय चुकलाच. सध्या जे ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मकदृष्टय़ा खेळत आहे, त्यांना निवड समितीत स्थान देणे योग्य नाही. आपल्याकडे अनेक माजी खेळाडू आहेत, त्यापैकी कुणालाही या निवड समितीत घेता आले असते.

सर्व पुरस्कारांसाठी समान मापदंड असावेत!  – जय कवळी, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सरचिटणीस

गेली अनेक वर्षे भारतीय बॉक्सिंग महासंघाकडून द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिव सिंग यांची शिफारस केली जाते, पण हा पुरस्कार मिळण्याच्या योग्यतेचे असूनही त्यांना या पुरस्कारासाठी का डावलण्यात येत आहे, तेच आम्हाला कळत नाही. शिव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने जागतिक स्पर्धेत पाच, युवा जागगिक स्पर्धेत पाच पदके पटकावली. मेरी कोमने पटकावलेले सहावे जगज्जेतपद हेसुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होते. जर वेगवेगळ्या खेळातील १० प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्काराच्या योग्यतेचे असतील आणि पाच जणांनाच हा पुरस्कार देण्याची तरतूद असेल तर उर्वरित पाच जणांवर अन्याय का? प्रत्येक क्रीडाप्रकारासाठी अर्जुन पुरस्कार देण्याची तरतूद आहे तर मग द्रोणाचार्य पुरस्कारासाठी वेगळे मापदंड का? त्यामुळे पुरस्कारांच्या धोरणात्मक नियमांबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. पुरस्कार देतानाची प्रक्रिया सुधारली जात आहे. पण त्यात आता अधिक सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. योग्यतेच्या उमेदवारांना पुरस्कारांच्या यादीत कसे सामावून घेतले जाईल, यादृष्टीने नियमांमध्ये बदल होण्याची गरज आहे.

वादाविषयी अधिक चर्चा होण्याची गरज! – सुमा शिरूर, आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे आपले धोरण काहीसे किचकट आणि गुंतागुंतीचे आहे. वैयक्तिक प्रशिक्षक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक हा वाद नेहमीच उफाळून येतो. आंतरराष्ट्रीय पदके मिळवू लागल्यानंतर खेळाडू राष्ट्रीय प्रशिक्षकाच्या नावाला पसंती देतात. पण त्यांच्या पदकात राष्ट्रीय प्रशिक्षकांचे योगदान किती आहे, हे तपासून पाहायला हवे. वैयक्तिक प्रशिक्षक हे खेळाडूंना सुरुवातीपासून घडवतात. त्यांचे कौशल्य, कलागुणांना पैलू पाडतात. माझ्या मते, जसपाल राणाच्या बाबतीतही हेच घडले आहे. मनू भाकर, सौरभ चौधरीसारखे जागतिक किर्तीचे नेमबाज जसपाल राणाने घडवले. मात्र त्यांनी राष्ट्रीय प्रशिक्षकाच्या नावाला पसंती दिली आहे, असे मला वाटते. त्यामुळे दोघेही द्रोणाचार्य पुरस्कारासाठी योग्य होते, असे मला वाटते. राष्ट्रीय प्रशिक्षक की वैयक्तिक प्रशिक्षक या वादावर आता अधिक चर्चा होण्याची गरज आहे. त्यानुसार धोरणात्मक नियमांमध्येही बदल होण्याची आवश्यकता आहे. सर्व पुरस्कारांसाठी वेगवेगळ्या समित्यांऐवजी यंदा १२ जणांची एकच समिती पुरस्कार निवडीसाठी नेमण्यात आली. या समितीत मेरी कोमला स्थान देण्यात आले. मात्र आपला वैयक्तिक प्रशिक्षक जर पुरस्कारांच्या शर्यतीत असेल तर त्या खेळाडूनेही दूर राहणे पसंत केले पाहिजे.

tushar.vaity@expressindia.com