जागतिक दर्जाच्या वाहनाबरोबरच ते चालविण्याचे अव्वल दर्जाचे कौशल्यही अनिवार्य असते याचा प्रत्यय घडवित परदेशातील मोटोक्रॉसपटूंनी पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. राष्ट्रीय सुपरक्रॉस शर्यतींच्या मालिकेतील पाचवी फेरी येथे आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीबरोबर झालेल्या परदेशी स्पर्धकांच्या चित्तथरारक कौशल्यांनी सर्वच चाहत्यांना अचंबित केले.
मुंढवा येथे गॉडस्पीड रेसिंगतर्फे आयोजित केलेल्या या शर्यतीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अँथनी रेनार्ड याने परदेशी विभागात सर्वोत्तम स्पर्धकाचा मान मिळविला. राष्ट्रीय शर्यतीमध्ये टीव्हीएस संघाचा खेळाडू के.पी.अरविंद याने सर्वोत्तम स्पर्धकाचे पारितोषिक मिळविले. कुमार स्पर्धकांच्या विभागात पुण्याच्या ऋग्वेद बारगुजे याने निर्विवाद वर्चस्व गाजविले. ऑस्ट्रेलियाच्या जॉन वेब व डॅनियल फोर्ड यांनी केलेली मोटोक्रॉसची साहसी प्रात्यक्षिके हे देखील या स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरले.
विद्युतप्रकाश झोतात झालेल्या या स्पर्धेबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. परदेशी विभागातील पहिल्या शर्यतीत अमेरिकेच्या ब्राईस स्टुअर्ट याने पहिल्या फेरीपासून आघाडी घेत शेवटपर्यंत टिकवित प्रथम क्रमांक मिळविला. मात्र दुसऱ्या शर्यतीत अँथोनी याने प्रथम स्थान घेत एकुणात विजेतेपद मिळविले तर स्टुअर्टला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. टेबल टॉप जम्प्स, ट्रिपलजम्प्स आदी अडथळे पार करताना परदेशी स्पर्धकांनी आपले अव्वल दर्जाचे कौशल्य सिद्ध केले. वेब व फोर्ड यांनी साहसी मोटोक्रॉसची प्रात्यक्षिकांच्या वेळी हवेत मोटारसायकलवर योगासने, हवेत उंच झेप, शिर्षांसने आदी रचना सादर केल्या, तेव्हा त्यांच्या कौशल्यास चाहत्यांनी शिट्टय़ा वाजवित दाद दिली.
अरविंद याने या स्पर्धेतील दोन विभागातील दोन्ही शर्यती जिंकून सातत्यपूर्ण कामगिरी केली. नाशिकचा यश पवार व पुण्याचा ऋग्वेद बारगुजे हे दोन्ही स्पर्धक केवळ पंधरा वर्षीय आहेत हे त्यांनी केलेल्या कसरतींवरून वाटतही नाही. त्यांचे वाहन चालविण्याचे कौशल्य आपण जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवू शकतो याचाच प्रत्यय घडविणारे होते.
गटवार निकाल-२५० ते ५०० सीसी-१.के.पी.अरविंद, २.तन्वीर अहमद, ३.ऋग्वेद बारगुजे. नवोदित स्पर्धक-१.यश पवार, २.अमल व्हर्गिस, ३.सुदीप कोठारी. खासगी वाहने अनुभवी स्पर्धक-१.सुहेल अहमद, २.पिकेंश ठक्कर, ३.व्यंकटेश शेट्टी. भारतीय अनुभवी स्पर्धक-१.के.पी.अरविंद, २.तन्वीर अहमद, ३.यश पवार. स्थानिक स्पर्धक-१.पिंकेश ठक्कर, २.लोकेश भोसले, ३.व्यंकटेश शेट्टी. कुमार गट-१.ऋग्वेद बारगुजे, २.कयान पटेल, ३.करण कार्ले.

सहाव्या वर्षी मोटोक्रॉसपटू
ऑर्नेलाज शाळेत शिकणारा रहीश खत्री या केवळ सहा वर्षीय मुलाने मोटोक्रॉसचे कौशल्याबाबत आपण कमी नाही हे दाखवून दिले. शर्यतीमधील अडथळे पार करताना त्याने दाखविलेला आत्मविश्वास खरोखरीच कौतुकास्पद होता. त्याने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर दोन विजेतेपदे मिळविली आहेत.