ऑस्ट्रलिया दौऱ्यात एकापाठोपाठ एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. रविंद्र जाडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि हनुमा विहारी यांना तिसऱ्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे ब्रिस्बेन कसोटीला मुकावं लागलं. त्यातच अखेरच्या कसोटी सामन्यात आणखी एका वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली. भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला स्नायूंमध्ये त्रास जाणवल्याने तो काही काळ मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो पुन्हा मैदानात आलादेखील होता पण अखेर दुखापत असह्य झाल्याने त्याने हॉस्पिटलची वाट धरली. बीसीसीआयने स्वत: याबद्दलची माहिती दिली.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनची पहिल्याच कसोटीत भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी

नवदीप सैनी स्वत:चे ८वे षटक टाकत होता. षटकाचा अखेरचा चेंडू टाकताना नवदीप सैनीच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याने गोलंदाजी थांबवली आणि त्याच्या जागी षटकाचा उरलेला एक चेंडू रोहित शर्माने टाकला. नवदीप सैनी थेट मैदानाबाहेर गेला. त्यानंतर त्याने प्रथमोपचार घेतले आणि तो काही काळ मैदानात परतला होता, पण त्याची दुखापत काहीशी गंभीर असल्याचं त्याला जाणवलं. त्रास असह्य झाल्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. तेथून तो हॉस्पिटलला रवाना झाला. त्याला दुखापतीनंतर स्कॅनसाठी नेण्यात आलं आहे. त्यामुळे भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.