पदार्पणवीर विल सॉमरविलेने न्यूझीलंडच्या मालिका विजयाचा सुवर्णाध्याय लिहिला. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. तिसरी आणि अखेरची कसोटी न्यूझीलंडने शुक्रवारी १२३ धावांनी जिंकून पाकिस्तानवर ४९ वर्षांनंतर प्रथमच परदेशात मालिका विजय संपादन केला.

ऑफ-स्पिनर सॉमरविलेने ५२ धावांत ३ बळी घेतले, त्याला फिरकी गोलंदाज अजाझ पटेलने ४२ धावांत ३ बळी घेत छान साथ दिली. त्यामुळे न्यूझीलंडचे ८० षटकांत २८० धावांचे लक्ष्य पाकिस्तानला पेलता आले नाही. ५६.१ षटकांत त्यांचा दुसरा डाव १५६ धावांत आटोपला.

कर्णधार केन विल्यम्सनच्या १३९ धावांच्या खेळीच्या बळावर सामन्याचा आणि मालिकेच्या निकालाला कलाटणी मिळाली. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर पाकिस्तानच्या यासीर शाहला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. न्यूझीलंडने याआधी १९६९मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या देशात १-० असा कसोटी मालिकेत विजय मिळवला होता.