गतविजेत्या रशियाच्या बॉक्सिंगपटूला धूळ चारत भारताच्या निखत झरीनने बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नोंदवला. 51 किलो वजनी गटाच्या सामन्यात निखतने चॅम्पियन खेळाडू पल्टेसेवा एकटेरिनाला 5-0 असे पराभूत केले. आता पुढच्या फेरीत तिला दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमशी झुंजावे लागणार आहे.

 

शिवा थापा, सोनिया लादर आणि परवीन यांचेही विजय

एशियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेत्या झरीनशिवाय, 2013 आशियाई चॅम्पियन शिवा थापा, सोनिया लादर आणि परवीन यांनीही आपापल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नोंदवला आहे. शिवाने पुरुषांच्या 63 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या सामगुलोव बागटीओव्हला 3-2 असे हरवले.

महिला गटातील दुसर्‍या फेरीत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेती सोनियाने 57 किलो वजनी गटात सुरमेनेली तुगकेनाझचा 5-0 तर, 60 किलो वजनी गटात परवीनने ओजिओल एसेराचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान, दुर्योधन नेगी (69 किलो), ब्रिजेश यादव (81 किलो) आणि किशन शर्मा (91 किलो) या बॉक्सिंगपटूंना सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी सोनिया, झरीन, परवीन आणि ज्योती (69किलो) महिला उपांत्यपूर्व फेरीच्या महिला गटात तर, पुरुष गटात शिवा आणि गौरव सोलंकी आपापले सामने खेळतील.