उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्यत्वासाठी नामांकन देण्यात आले आहे. आयओसीच्या विशेष सत्रात जर त्या निवडून आल्या तर क्रीडा क्षेत्रातील या शिखर संघटनेवरील त्या पहिल्या भारतीय महिला ठरतील.
स्वित्र्झलडमधील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही ऑलिम्पिक चळवळीचे नियंत्रण करते आणि याच समितीच्या आधिपत्याखाली उन्हाळी तसेच हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा होतात.
‘‘रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष नीता अंबानी यांना आयओसीच्या निवडणुकीसाठी नामांकन देण्यात आले आहे,’’ असे आयओसीच्या पत्रकात म्हटले आहे. रिओ दी जानेरो येथे २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या १२९व्या आयओसी सत्रात ही निवडणूक होणार आहे.
ऑलिम्पिक कार्यक्रमपत्रिका २०२० शिफारशींनुसार ही रिक्त पदे भरण्यासाठी स्वतंत्र निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अंबानी निवडून आल्यास वयाची ७० वष्रे पूर्ण होईपर्यंत त्या पदावर कायम असतील. सर दोराबजी टाटा हे आयओसीवरील पहिले भारतीय प्रतिनिधी होते.

खेळाच्या ताकदीवर माझा विश्वास आहे. जे विविध जात-धर्म, संस्कृती आणि पिढी यांच्यातील दरी मिटवतात. आयओसीने दिलेल्या संधीबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. भारत आणि भारतीय स्त्रीचा हा सन्मान आहे. आयओसीचे कार्य करण्यासाठी मी माझे महत्त्वपूर्ण योगदान देईन.
– नीता अंबानी