चांगली कामगिरी करण्याबाबत आशावादी असलेल्या भारताला शनिवारी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत एकही पदक मिळविता आले नाही. चौथ्या दिवशी भारताची पदकाची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी भारत आणखी काही पदकांची भर घालून स्पर्धेचा शेवट गोड करेल, अशी अपेक्षा आहे. भारताच्या आशा रॉय, श्रावणी नंदा व दुती चांद यांनी महिलांच्या २०० मीटर शर्यतीत अंतिम फेरी गाठली. टिंटू लुका हिला ८०० मीटर शर्यतीत पदकाच्या आशा आहेत.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत आशा रॉय हिने तिसऱ्या प्राथमिक फेरीत प्रथम स्थान मिळविताना २४.०१ सेकंद अशी वेळ नोंदविली. दुती चांद हिने पहिल्या प्राथमिक फेरीत दुसरे स्थान घेतले. तिला हे अंतर पार करण्यास २३.७६ सेकंद वेळ लागला. श्रावणी नंदा हिने दुसऱ्या प्राथमिक फेरीत तिसरे स्थान मिळविताना २४.२० सेकंद वेळ नोंदविली.
हाँगकाँगच्या खेळाडूंनी पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून सनसनाटी कामगिरी नोंदवली. त्यांनी हे अंतर ३८.९४ सेकंदात पार केले. जपानने ३९.११ सेकंदासह रौप्यपदक तर चीनने ३९.१७ सेकंद अशी कामगिरी नोंदवत कांस्यपदक पटकाविले. यजमान भारतीय संघ शुक्रवारीच शर्यतीतून बाद झाला होता.
महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीचे विजेतेपद चीनकडे गेले. त्यांनी हे अंतर ४४.०१ सेकंदात पार केले. जपान (४४.३८ सेकंद) व थायलंड (४४.४४ सेकंद) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.
महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये चीनच्या ली लिंग हिने सुवर्णझेप घेताना ४.५४ मीटर असा स्पर्धाविक्रम प्रस्थापित केला. २००५मध्ये गाओ शुयांग हिने नोंदवलेला ४.५३ मीटरचा विक्रम तिने मोडीत काढला. लिंगची सहकारी रेन मिंगक्विन (४.४० मीटर) हिला रौप्यपदक मिळाले तर थायलंडच्या सुकन्या चोमचोन्दे (४.१५ मीटर) हिने कांस्यपदक मिळवले.
पुरुषांच्या हातोडाफेकीत, ताजिकिस्तानच्या दिलशाद नाझारोव्हने सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने सहाव्या प्रयत्नात ७८.३२ मीटर अंतर पार केले. कुवैतच्या अली झेन्कावीने (७४.७० मीटर) याने रौप्यपदक मिळविले तर चीनच्या ओई दकाल (७४.१९ मीटर) याला कांस्यपदक मिळाले.
महिलांच्या गोळाफेकीत चीनने सुवर्ण व कांस्यपदकाची कमाई केली. चीनच्या लिऊ झियांगरोंगने १८.६७ मीटपर्यंत गोळाफेक करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. इराणच्या लियला रजाबी हिने १८.१८ मीटर अशी कामगिरी नोंदवत रौप्यपदक पटकावले. चीनच्या गाओ यांग हिला १७.७६ मीटरसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये थायलंडच्या विनातो वासानाने सोनेरी कामगिरी केली. तिने उंच उडी, भालाफेक आदी प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत एकूण ५८१८ गुणांची कमाई केली. उजबेकिस्तानच्या वोरोनिना येकातेरिना (५५९९ गुण) हिला रौप्यपदक मिळाले तर जपानच्या  चेई किरियामा (५४५१ गुण) हिने कांस्यपदक पटकावले. तिची सहकारी फुमी ताकेहारा (५४०१) हिला चौथे स्थान मिळाले. भारताच्या सुस्मिता सिंग रॉय (५३२८ गुण), नवप्रीत कौर (५२१७ गुण) व लिस्की जोसेफ (४९८९ गुण) यांना अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सांगता समारंभात पूजा सावंत, नेहा पेंडसे
स्पर्धेचा सांगता समारोह रविवारी शिवछत्रपती क्रीडानगरीत संध्याकाळी होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत व नेहा पेंडसे यांचा सहभाग हे या सांगता समारंभाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. या समारंभात भांगडा, ओरिसातील रानप्पा नृत्य, मध्य प्रदेशमधील चेरेपाटा नृत्य, मारी अम्मा नृत्य, गुजराती गरबा, लावणी, हिंदी गीताच्या तालावर योगासने आदी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. अभिनेत्री पूजा सावंत ही ‘अप्सरा आली’ आणि ‘वाजले की बारा’ या दोन लावण्या सादर करणार आहे. गायक राहुल सक्सेनाच्या १० ते १२ मिनिटांच्या कार्यक्रमात विविध नृत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
ढोल-ताशामुळे वातावरणात उत्साह
आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला प्रेक्षकांचा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद लाभत असल्यामुळे वातावरण निराशामय झाले होते. पण चौथ्या दिवशी या वातावरणात उत्साह आणण्याचे काम ढोल ताशासह आलेल्या प्रेक्षकांनी केले. त्याचबरोबर काही चाहते बिगुलही घेऊन आले होते. या प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवला.

पदकतक्ता
क्र.    देश                                                           सुवर्ण    रौप्य    कांस्य    एकूण
१.    चीन                                                                   १२     ४    ५    २१
२.     बहारीन                                                               ४     ४    १     ९
३.     उजबेकिस्तान                                                     ३     ४    १    ८
४.     सौदी अरेबिया                                                     ३     ०     ०    ३
५.    जपान                                                                  २     ४    ८    १४
६.     भारत                                                                  १     ३    ५    ९
७.     कझाकिस्तान                                                      १     १    २    ४  
८.     थायलंड                                                               १     ०    २    ३
९.     यूएई                                                                    १     १    ०    २
१०.     हाँगकाँग                                                            १    ०    ०    १