आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच युएईत पार पडला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०२१ साली बीसीसीआय आयपीएलचंच मेगा ऑक्शन करण्याच्या तयारीत आहे. परंतू InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार काही संघमालकांना अंतिम ११ च्या टीममध्ये ४ ऐवजी परदेशी खेळाडू हवे आहेत.

बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे अंतिम संघ निवडताना जास्तीत जास्त ४ परदेशी खेळाडूंना संघात जागा देता येते. “गेल्या काही हंगामांपासून काही संघमालक अंतिम ११ च्या टीममध्ये परदेशी खेळाडूंची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी करत आहेत. आम्ही अद्याप यावर चर्चा केलेली नाही. यंदाही काही संघमालकांनी याबद्दल विनंती केली आहे. योग्य वेळ येताच याविषयी चर्चा होईल.” BCCI च्या सूत्रांनी InsideSport ला माहिती दिली.

दरम्यान आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव करायचा की नाही याबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. एप्रिल-मे च्या दरम्यान बीसीसीआय भारतातच आयपीएलचं आयोजन करणार आहे.