लिएण्डर पेसची सातवी ऑलिम्पिकवारी हुकणार?
लंडन ऑलिम्पिकप्रमाणेच रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर भारतीय टेनिस संघाची निवड वैयक्तिक अहंकार आणि बंडाळ्यांच्या गर्तेत सापडली आहे. रोहन बोपण्णाने अनुभवी लिएण्डर पेसऐवजी साकेत मायनेनीला पसंती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावल्याने बोपण्णाला ऑलिम्पिकमध्ये सहकारी निवडण्याची मुभा मिळाली. यानुसार बोपण्णाने साकेत मायनेनीला पसंती दिली आहे. मात्र याच वेळी अनुभवी लिएण्डर पेस सातव्यांदा विक्रमी ऑलिम्पिकवारी करण्यास उत्सुक आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावत तंदुरुस्ती आणि फॉर्म दोन्ही आघाडय़ांवर पेसने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याच्या नावावर १८ ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाने बोपण्णाच्या नावाला प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत पेसची विक्रमी ऑलिम्पिकवारी अंतर्गत लढाईमुळे हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने बोपण्णाला पेससह खेळण्यासाठी विनंती केली आहे.
‘‘ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आतुर आहे. क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धेत तिरंग्याचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा माझा सन्मान आहे आणि जबाबदारीही आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावल्याने ऑलिम्पिकमध्ये सहकारी निवडण्याची संधी मला मिळाली आहे. पदक पटकावण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय मी निवडला आहे. ऑलम्पिकशी निगडित प्रत्येकाला शुभेच्छा,’’ असे निवेदन बोपण्णाने जाहीर केले आहे. निवेदनात बोपण्णाने नाव प्रसिद्ध केलेले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोपण्णाने मायनेनीची निवड केल्याचे वृत्त आहे.
पेसचा अनुभव भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, मात्र बोपण्णाला त्याची पर्वा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ क्रमवारीत दहामध्ये असल्याने बोपण्णाला सहकारी निवडण्याची मुभा मिळाली. मात्र बोपण्णा अव्वल दहाच्या बाहेर राहिला असता तर दोघांच्या एकत्रित क्रमवारीतील स्थानासह त्यांची रिओवारी पक्की झाली असती.
‘‘बोपण्णाची निवड योग्य नाही. पेसची विक्रमी ऑलिम्पिकवारी रोहनमुळे हुकली हे चाहते विसरणार नाहीत. त्याच्यावर चहूबाजूंनी टीका होण्याची शक्यता आहे,’’ असे अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.