धावपटू उसेन बोल्टशी बरोबरी; महिलांमध्ये सिमोन बाइल्स हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब

 मोनाको : गतवर्षांत प्रतिष्ठित चार ग्रँडस्लॅमपैकी दोन स्पर्धाचे विजेतेपद मिळवणारा सर्बियाचा नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने सोमवारी मध्यरात्री चौथ्यांदा लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारावर नाव कोरले. वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाइल्स, गोल्फपटू टायगर वूड्स व फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्स संघानेसुद्धा मानाचे पुरस्कार पटकावले.

२०१८मध्ये जोकोव्हिचने विम्बल्डन व अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. त्याशिवाय या वर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही त्याने विजयश्री खेचून आणली. जोकोव्हिचला फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियान एम्बाप्पे, एलिउड किपचोज आणि ली ब्रॉन जेम्स यांच्याकडून कडवी लढत मिळाली. मात्र अखेरीस जोकोव्हिचनेच बाजी मारली. जोकोव्हिचने विश्वातील वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या चार पुरस्कारांशी बरोबरी केली असून पाच पुरस्कारांसह अव्वल स्थानावर असलेल्या रॉजर फेडररपेक्षा तो फक्त एका पुरस्काराने मागे आहे.

या पुरस्कारासाठी २०१८ या वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्याशिवाय ६८ खेळाडूंना या पुरस्कारांसाठी नामांकन लाभले होते. महिलांमध्ये सिमोनने वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. २०१७मध्येसुद्धा सिमोनने या पुरस्कारावर नाव कोरले होते. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीच सिमोनने १४ जेतेपदे मिळवली आहेत.

त्याशिवाय रशियात झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्सला ‘वर्षांतील सर्वोत्तम संघ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. एकाच वर्षी दोन वेळा सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावणारा फ्रान्स हा पहिला संघ ठरला आहे.

मागील वर्ष माझ्यासाठी संस्मरणीय होते. दुखापतीतून सावरत विम्बल्डन व अमेरिकन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यामुळे मला हे यश आयुष्यभर लक्षात राहिल. मला या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी लॉरेओ अकादमीचे मनापासून आभार मानतो.

– नोव्हाक जोकोव्हिच, सर्बियाचा टेनिसपटू