उपांत्य फेरीत मोनफिल्सचे आव्हान; महिलांमध्ये वोझ्नियाकी आणि कर्बर आमनेसामने

गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच पुन्हा एकदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाल्याने आता तो तेराव्या ग्रँड स्लॅम जेतेपदापासून फक्त दोन पावले दूर आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुखापतीमुळे जोकोव्हिचचा प्रतिस्पर्धी जो-विलफ्रेड त्सोंगाला सामना अध्र्यावर सोडावा लागला. महिलांमध्ये कॅरोलिन वोझ्नियाकी आणि अँजेलिक्यू कर्बर यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

या सामन्यात जोकोव्हिच ६-३, ६-२ असा आघाडीवर असताना त्सोंगाची दुखापत बळावली आणि त्याने माघार घेतली. गेल्या पाच सामन्यांमध्ये तिसऱ्यांदा प्रतिस्पध्र्याच्या दुखापतीमुळे जोकोव्हिचला पुढे चाल मिळू शकली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जोकोव्हिचचा प्रतिस्पर्धी मिखाईल युझ्नीला दुखापतीमुळे लढत सोडावी लागली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये नवव्या मानांकित त्सोंगाला दुसऱ्या सेटमध्ये गुडघ्याची दुखापत बळावली, त्यामुळे त्याने निवृत्ती पत्करली आणि जोकोव्हिचला पुढे चाल देण्यात आली.

दुसऱ्या सेटमध्ये २-५ अशा पिछाडीवर असताना त्सोंगाने फिजिओला बोलावले. त्याच्यावर तात्पुरते इलाज करण्यात आले. दुसरा सेट गमावल्यावर तिसरा सेट सुरू झाल्यावर त्सोंगाला दुखापती खेळणे शक्य झाले नाही. उपांत्य फेरीत त्याला फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचा सामना करावा लागणार असून त्याने उपांत्यपूर्व फेरीमध्ये लुकास पाऊइलेवर ६-४, ६-३, ६-३ असा सहज विजय मिळवला.

महिलांच्या उपांत्यपूर्व लढतीत वोझ्नियाकीने अनास्तासिजा सेव्हास्तोव्हाचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. वोझ्नियाकीने २००९ आणि २०१४ साली या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली असली तरी तिला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१० आणि २०११ साली तिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. ऑस्ट्रेलियातील टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या कर्बरने इटलीच्या रोबेर्टा व्हिन्सीवर ७-५, ६-० असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी २०११ साली कर्बरने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

कर्बर आणि वोझ्नियाकी यांच्यामध्ये आतापर्यंत १२ सामने झाले आहेत. यापैकी कर्बरने सात आणि वोझ्नियाकीने पाच सामने जिंकले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये माझा खेळ आणि कामगिरीचा स्तर उंचावला आहे. या गोष्टीचा फायदा मला उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी निश्चितच होईल. या स्पर्धेमधील प्रत्येक सामन्यागणिक माझी कामगिरी उंचावत जात आहे.

नोव्हाक जोकोव्हिच

 

सानिया-बार्बाराचे आव्हान संपुष्टात

भारताची सानिया मिर्झा आणि तिची चेक प्रजासत्ताकची महिला दुहेरीतील सहकारी बार्बारा स्ट्रायकोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. फ्रान्सच्या अव्वल मानांकित कारोलिन गार्सिया आणि क्रिस्तिना म्लाडेनोव्हिक यांनी सानिया-बार्बारा जोडीचा ७-६ (७-३), ६-१ असा ६९ मिनिटांमध्ये पराभव केला. सायनाच्या या पराभवाने भारताचे सर्वच खेळाडू स्पध्रेतून बाद झाले आहेत. यापूर्वी भारताच्या रोहन बोपण्णा, लिएण्डर पेस, साकेत मायनेनी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.