जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने हुआन मार्टिन डेल पोट्रो याच्याविरुद्ध संघर्षपूर्ण विजय नोंदवत, तर राफेल नदालने सलग दोन सेटमध्ये बाजी मारत इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

जोकोव्हिचने उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी तीन तास संघर्ष केला. पोट्रोविरुद्ध पहिला सेट ४-६ असा गमावल्यानंतर मागे वळून न पाहता जोमाने पुनरागमन करत जोकोव्हिचने पुढील दोन सेट ७-६, ६-४ असे जिंकत बाजी मारली. त्यामुळे आता उपांत्य सामन्यात जोकोव्हिचला अर्जेटिनाच्या दिएगो श्वात्र्झमान याच्याविरुद्ध झुंजावे लागणार आहे. दिएगोने उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या केई निशिकोरी याला ६-४, ६-२ असे सलग दोन सेटमध्ये पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली आहे.

स्पेनच्या नदालने आपल्याच देशाच्या फर्नाडो व्हेर्डास्को याला ६-४, ६-० असे सहजपणे पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. नदालला आता ग्रीसच्या स्टेफॅनोस त्सित्सिपासशी झुंजावे लागणार आहे. फेडररने उपांत्यपूर्व फेरीत पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने त्सित्सिपासला विजयी घोषित करण्यात आले होते. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत त्सित्सिपासने नदालला धक्का दिला होता. त्यामुळे नदाल विरुद्ध त्सित्सिपास या सामन्याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.