भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका

कसोटी आणि ट्वेन्टी-२० प्रकारात इंग्लंडवर वर्चस्व गाजवल्यानंतर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी नोंदवण्याचे भारताचे लक्ष्य आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत रोहित शर्मा-शिखर धवन ही अनुभवी जोडी सलामीला उतरणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केल्यामुळे प्रामुख्याने धवनच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

विश्वविजेत्या इंग्लंडकडून एकदिवसीय मालिकेत अधिक कडव्या प्रतिकाराची अपेक्षा आहे. त्यामुळे संघनिवडीच्या दृष्टीने कठोर निर्णय भारताला घ्यावे लागतील. ३५ वर्षीय धवनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात छाप पाडता न आल्यामुळे संघातील स्थान गमवावे लागले. त्यामुळे आता या दमदार कामगिरीद्वारे धवन एकदिवसीय संघातील स्थान पक्के करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

सलामीच्या स्थानासाठी के. एल. राहुल, शुभमन गिलही शर्यतीत आहेत. त्याशिवाय मुंबईचा पृथ्वी शॉ आणि कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल यांनी विजय हजारे करंडक स्पर्धेत धावांचा रतीब रचल्यानंतरही त्यांच्याकडे तूर्तास दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे धवनसाठी संघातील स्थान टिकवण्यासह टीकाकारांची तोंडे बंद करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

सूर्यकुमार-श्रेयसमध्ये चौथ्या क्रमांकासाठी चुरस

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनानंतर ऋषभ पंतचे भारताच्या एकदिवसीय संघातही पुनरागमन झाले आहे. त्याचा अंतिम ११ खेळाडूंतील समावेश निश्चित मानला जात आहे. त्याशिवाय के. एल. राहुल एकदिवसीय सामन्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून पाचव्या क्रमांकावर खेळत असल्याने चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोन मुंबईकर खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे.

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा

* इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लिआम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, रीसी टॉप्ले, मार्क वूड, जेक बॉल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान.

ट्वेन्टी-२० विश्वचषकात मी आणि रोहित सलामीला येण्यासंबंधी अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. एकदिवसीय प्रकारात रोहित-धवन आमचे प्रथम पसंतीचे सलामीवीर आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतसुद्धा त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल. अनुभवी फलंदाजांभोवती संघबांधणी करतानाच युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयोग आम्ही या मालिकेतसुद्धा करू.

– विराट कोहली, भारताचा कर्णधार

* वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)