ओर्लीअन्स बॅडमिंटन स्पर्धा

अमेरिकेच्या इरिस वँगविरुद्धच्या लढतीत संघर्षपूर्ण विजय मिळवत भारताच्या सायना नेहवालने शुक्र वारी ओर्लीअन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र किदम्बी श्रीकांत आणि इरा शर्मा यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत २०व्या स्थानावर असलेल्या सायनाने गेल्या दोन वर्षांत प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. कारकीर्दीतील चौथ्या ऑलिम्पिक स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सायनाने जानेवारी २०१९मध्ये इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठल्यानंतर ती स्पर्धा जिंकली होती. भारताच्या चौथ्या मानांकित सायनाने गेल्या आठवड्यात दुखापतीमुळे ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली होती. सायनाने जागतिक क्र मवारीत ३६व्या क्रमांकावर असलेल्या वँगला २१-१९, १७-२१, २१-१९ असे नामोहरम केले.

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्ह याच्याकडून १९-२१, १७-२१ अशी हार पत्करावी लागली. श्रीकांतने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण टोमाच्या वेगवान खेळासमोर त्याचा निभाव लागला नाही. महिला एकेरीत इरा शर्मा हिला डेन्मार्कच्या ख्रिस्तोफरसेन हिने ११-२१, ८-२१ असे सहज हरवले. इरा हिच्याकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. पण चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात ती अपयशी ठरली.

महिला दुहेरीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने इंग्लंडच्या तिसऱ्या मानांकित श्लोई बिर्श आणि लॉरेन स्मिथ जोडीचा २१-१४, २१-१८ अशा फरकाने पराभव केला.

पुरुष दुहेरीत कृष्णा प्रसाद गरगा आणि विष्णू वर्धन जोडीने फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्ह आणि टोमा ज्युनिअर पोपोव्ह जोडीला २१-१९, १८-२१, २३-२१ अशा फरकाने पराभूत के ले. परंतु इंग्लंडच्या कॅ लम हेमिंग्ज आणि स्टीव्हन स्टॉलवूड जोडीने एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीचा २१-१९, १८-२१, २३-२१ असा पराभव केला.