आशिया चषकावर भारताने सातव्यांदा नाव कोरले आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चषकावर नाव कोरले. पण आशिया चषकातील धोनीच्या फलंदाजीवर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजीची धोनीवर होती. मात्र धोनी लौकीकास कामगिरी करण्यात अपयशी ठरला. धोनीच्या कामगिरीवर माजी प्रशिक्षक आणि कर्णधार अनिल कुंबळेनेही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

धोनी आता पूर्वीसारखा ‘फिनिशर’ राहिलेला नाही हे त्याच्या सध्याच्या खेळावरुन लक्षात येते. यष्टीरक्षणात तो आजही तीच चपळाई दाखवत असला तरी फलंदाजी करताना त्याला सतत येणारे अपयश ही विराट कोहलीसाठी चिंतेची बाब ठरत आहे. विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आला असताना धोनीवर एक फिनिशर म्हणून अवलंबून राहणे चुकीचे असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संघाची मधल्या फळीतील अडचण अजूनही संपलेली नाही. विश्वचषकामध्ये भारतीय संघ धोनीवर फिनिशर म्हणून अवलंबून राहू शकत नाही. त्याला फक्त मैदानात खेळाचा आनंद घेऊन द्यावा. धोनीने संघातील तरुण खेळाडूंना फिनिशिंग कसे करावे याचे मार्गदर्शन करावे. भारतीय संघाने धोनीच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा, असे मत कुंबळेने व्यक्त केले आहे.