भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहासातील अपयशावर मात करीत स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असा सरळ पराभव करीत धूळ चारली.

स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने उपात्यपूर्व फेरीत शनिवारी चीनच्या चेन यू फेईचे आव्हान सहज परतवून लावले होते. सिंधूने फेईचा २१-७, २१-७ असा सरळ पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाने सिंधूला दोनवेळा हुलकावणी दिली होती. मात्र मागील अपयशावर मात करीत सिंधूने अखेर जेतेपदाला गवसणी घातली. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकावरील जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सिंधूचा सामना झाला. या सामन्यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यातील जय पराजयाची आकडेवारी ही 8-7 अशी होती. रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने ओकुहाराला अवघ्या ३७ मिनिटांत सरळ सेटमध्ये २१-७, २१-७ ने पराभूत करून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. सुरुवातीलाच सिंधूने आक्रमक खेळी करत दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ती यशस्वीही झाली. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या १६ मिनिटांत पहिला गेम २१-७ असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग ८ गुणांची कमाई केली. सिंधूने पुढच्या अवघ्या सहा मिनिटांत ओकुहारावर ७-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने आत्मविश्वासानं खेळ करताना ओकुहाराला पराभूत केले. सिंधूने हा सामना २१-७, २१-७ असा जिंकला. तसेच या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची ओकुहारा परतफेडही केली.

सिंधूने दमदार खेळाचे प्रदर्शन करीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. उत्कृष्ट खेळ करीत सिंधूने भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली आहे. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिंधूचे अभिनंदन. आवड आणि मेहनतीने तिने बॅडमिंटनला प्रेरणादायी केले आहे. पी.व्ही. सिंधूचे यश येणाऱ्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणा देईल, असे मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.