भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. करोनाग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी हे सामने भरवावेत असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने ठेवला होता. त्यानंतर शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा, शोएब मलिक अशा पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंनीही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव लक्षात घेता अशी क्रिकेट मालिका सध्या तरी शक्य नसल्याचे क्रिकेट जाणकारांनी सांगितले. तसेच, IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना अद्यापही प्रवेश न देण्यावर BCCI ठाम आहे. पण IPL च्या पहिल्या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंना विविध संघात स्थान देण्यात आले होते. त्याचबद्दल पाकचा वेगवान माजी गोलंदाज उमर गुल याने मत व्यक्त केले आहे.

“IPL स्पर्धेत खेळाताना आम्ही खूप मजा केली. अशाप्रकारची खासगी स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच खेळत होतो. २००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेत मी सर्वाधिक बळी टिपले होते. त्यामुळे मला IPL मध्ये स्थान मिळाले होते. IPL संपताना शेवटच्या काही सामन्यांसाठी मला बोलवण्यात आले होते, कारण त्याआधी बांगलादेशचा संघ आमच्या देशात खेळत होता अन त्याच वेळी पहिल्याच सामन्यात मॅक्क्युलमने १५८ धावांची खेळी केली होती. अशी सुरूवात मिळणाऱ्या स्पर्धेबाबत सारेच उत्सुक होते. त्यानंतर आम्ही भारतात गेलो. पाकिस्तानी खेळाडूंचेही भारतात खूप चाहते आहेत हे तेव्हा समजलं. पण IPL पूर्णपणे वेगळ्याच स्तरावरील स्पर्धा आहे. IPL म्हणजे एक उत्सवच असायचा”, असा अनुभव उमर गुलने ‘क्रिककास्ट’मध्ये बोलताना सांगितला.

“IPL चे सामने संपल्यानंतर हॉटेलवर वेगवेगळे कार्यक्रम असायचे. अभिनेता शाहरूख खान संघाचा मालक असल्याने त्या कार्यक्रमांना वेगळीच मजा होती. सामना हरला किंवा जिंकला, तरी प्रायोजक कंपनीसाठी फोटोशूट असायचे आणि त्यानंतर संघातील खेळाडूंसाठी पार्टी असायची. IPL खरंच खूप छान अनुभव होता. मी युवा खेळाडू असल्याने मला खूप शिकायला मिळालं. बड्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळाल्यामुळे त्यांचं आयुष्य ते कसं जगतात, ते समजलं”, असेही तो म्हणाला.