पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. मात्र पाकिस्तानसाठी मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये आमीर खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आमीरने आपला निर्णय कळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करायला मिळालं हा माझा गौरव आहे…पण आता मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी निवृत्त होण्याचं ठरवलं आहे.

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला होता, मात्र आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून देण्यामध्ये तो अपयशी ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करणं हे माझं स्वप्न होतं. आगामी टी-२० विश्वचषकात मी संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय आपल्यासाठी सोपा नसल्याचंही आमीरने सांगितलं. यावेळी आमीरने आपल्याला दिलेल्या संधीबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.

जुलै २००९ साली श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटी सामन्यात आमीरने पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने ३६ कसोटी सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं, या सामन्यांमध्ये आमीरने ३० च्या सरासरीने ११९ बळी घेतले. एप्रिल २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्जस्टन कसोटीत ४४ धावांत घेतलेले ६ बळी ही आमीरची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे.