पाकिस्तानविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आफ्रिकेने ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याने दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेलूकव्हायोवर वर्णभेदी टीका केली होती. त्याऊर्न त्याच्यावर टीका झाल्यानंतर सर्फराझने फेलूकव्हायोची भेट घेऊन त्याची माफी मागितली.

डर्बन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ २०४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. त्यावेळी आफ्रिकेची अवस्था ५ बाद ८० अशी झाली होती. पण त्यानंतर वॅन डर डसन आणि अँडील फेलूकव्हायो या दोघांनी शेवटर्यंत लढा देत सामना जिंकवला. त्याच्या या चिवट खेळीमुळे कंटाळलेल्या पाकिस्तानच्या कर्णधाराचा मैदानावर तोल सुटला आणि त्याने फेलूकव्हायोवर वर्णभेदी टीका केली. ‘ए काळ्या, तुझ्या आईला तू कुठे बसवून आला आहेस? आईला काय प्रार्थना करायला सांगितली आहेस?’, असे वक्तव्य त्याने केले होते. त्यानंतर सर्फराझने त्याची भेट घेत त्याची माफी मागितली. सर्फराझने याबाबतचे ट्विट केले आहे. त्यात त्याने फेलूकव्हायोसोबतच फोटोदेखील पोस्ट केला आहे.

‘मी फेलूकव्हायोची भेट घेतली आणि त्याची माफी मागितली. त्यानेही मोठ्या मनाने मला माफ केले. आफ्रिकेतील जनताही मला माफ करेल अशी माझी अपेक्षा आहे’, असे त्याने ट्विट केले आहे.