पाकिस्तानमधील कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. दहशतवादाच्या सावटाखाली श्रीलंका क्रिकेट मंडळाने पाकिस्तान दौऱ्याचा निर्धार केला. त्यानुसार मंगळवारी श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला पोहोचला आणि तब्बल १० वर्षानंतर पाकिस्तानात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना रंगला. पाकिस्तानात तब्बल १० वर्षानंतर श्रीलंकेविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आल्यामुळे हा दिवस पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा होता. पण नेमके याच दिवशी पाकिस्तानवर आणि नॅशनल स्टेडिअमवर ट्रोल होण्याची नामुष्की ओढवली.

२००९ साली श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर कोणताही मोठा आणि बलाढ्य संघ पाकिस्तानात गेला नव्हता. पण अखेर सोमवारी श्रीलंकेचा संघ प्रथमच पाकिस्तानात खेळला. त्यामुळे स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याला प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती असेल, असा अंदाज बांधला जात होता. पण, प्रत्यक्षात अत्यंंत कमी प्रेक्षकवर्ग या सामन्याला उपस्थित राहिला. इतकेच नव्हे तर सामन्या दरम्यान दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने फ्लडलाईट्स बंद पडले आणि त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. अशा प्रकारच्या सुमार दर्जाच्या आयोजनामुळे चाहते आणि नेटिझन्सने पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली.

दरम्यान, कराचीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेवर पाकिस्तानने ६७ धावांनी मात केली. बाबर आझमच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ३०५ धावांचा पल्ला गाठला. बाबरने संयमी खेळी करत १०५ चेंडूत ११५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यानंतर उस्मान शिनवारीने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.