पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळवली जात नाही. आयसीसीच्या स्पर्धा वगळता हे दोन्ही संघ समोरासमोर येत नाहीत. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचं कारण देत भारताने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे. गेल्या काही काळात अनेक माजी पाक खेळाडूंनी भारतासोबत क्रिकेट मालिका पुन्हा सुरु करावी असा प्रस्ताव दिला होता. यावर बीसीसीआय आणि भारतीय खेळाडूंनी भारत-पाक मालिकेची कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं होतं. २०१३ पासून दोन्ही संघांमध्ये मालिका खेळवली गेलेली नाही.

पाकिस्तान भारतासोबत क्रिकेट खेळायला तयार आहे, मात्र त्यासाठी आम्ही बीसीसीआयच्या मागे धावणार नाही अशी स्पष्ट भूमिका पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी घेतली आहे. “पाक क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष या नात्याने मी एक निर्णय घेतला आहे. मला बीसीसीआयला सांगायला आवडेल की आम्ही भारतासोबत क्रिकेट मालिका खेळण्यास तयार आहोत. मात्र यासाठी आता आम्ही तुमच्या मागे धावणार नाही. पाकिस्तानसोबत क्रिकेट कधी खेळायचं हा आता त्यांचा प्रश्न आहे.” क्रिकेट ऑथर पीटर ओब्रोन आणि रिचर्ड हेलर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना मणी यांनी पाक क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट केली.

सध्या पाकिस्तानी संघ इंग्लंडमध्ये आहे. ऑगस्ट महिन्यापासून पाकिस्तानी संघ इंग्लडमध्ये ३ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनानंतर पाकिस्तानचा हा पहिलाच दौरा असणार आहे.