रणजी हंगाम सुरू होण्याआधी विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची संघटनेकडे विचारणा

ज्या संघातील खेळाडूंकडून माफक अपेक्षा केल्या जात होत्या, त्यांना राष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च विजेतेपद जिंकून देण्याची किमया साधणे, ही अजिबात सोपी गोष्ट नाही. विदर्भाचे किमयागार प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी यंदाचा रणजी हंगाम सुरू होण्यापूर्वीच मिळणाऱ्या पारितोषिकाचे तुम्ही काय कराल, अशी विचारणा संघटनेकडे केली होती.

पाच दशकांच्या प्रयत्नांनंतर रणजी जेतेपद जिंकल्यानंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांनी पंडित यांच्या आठवणी ताज्या केल्या. हंगामाच्या आधी संघटनेशी करारबद्ध होताना पंडित यांनी माझ्याकडे बक्षीस रकमेचे काय करणार, असा प्रश्न विचारला होता, असे वैद्य यांनी सांगितले. आश्चर्यचकित झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने पंडित यांनाच विचारले की, ‘‘कोणत्या बक्षीस रकमेविषयी तुम्ही बोलत आहात?’’ यावर पंडित शांतपणे उत्तरले, ‘‘जी रणजी करंडक जिंकल्यास मिळते, त्याबद्दलच मी बोलत आहे!’’

‘‘रणजी करंडक जिंकण्याचे या व्यक्तीने आधीच निश्चित केले आहे. त्यांच्या आत्मविश्वासाने मी भारावून गेलो. यंदाचा हंगाम विदर्भासाठी नक्की खास असेल, याविषयी मला खात्री झाली. पंडित जेव्हा नागपूरला आले, तेव्हा पहिल्या दिवसापासूनच मला त्यांच्याविषयी विश्वास वाटू लागला,’’ असे वैद्य यांनी सांगितले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंडित यांची प्रशिक्षक म्हणून कारकीर्द यशस्वी ठरली आहे. भारताचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संघांनी चार वेळा अंतिम फेरी गाठताना तीनदा विजेतेपद जिंकले आहे. फक्त मागील वर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत गुजरातकडून पराभूत झाल्यामुळे मुंबईचे प्रशिक्षकपद पंडित यांना गमवावे लागले होते.

मुंबईच्या अनेक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंडित यांनी विदर्भाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. याबाबत ते म्हणाले, ‘‘मी लक्ष्यप्राप्तीचा नेहमीच विचार करीत असतो. प्रत्येकाला जेतेपद जिंकावेसे वाटत असते. पण मला असे वाटते की, या जेतेपदामुळे फक्त संघातच बदल होणार नाही, तर उदयोन्मुख खेळाडूंवर त्याचा उत्तम प्रभाव पडेल. १४ ते १६ वष्रे वयोगटातील खेळाडूंना आपणसुद्धा जिंकू शकू, हा विश्वास निर्माण होईल. हीच संस्कृती विदर्भात निर्माण केल्यास मला त्याचा आनंद होईल.’’

फैझ फझलमुळे संघात सकारात्मक ऊर्जा!

‘‘आमच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी बजावली. रजनीश गुर्बानीने या हंगामावर छाप पाडली. वसिम जाफर, गोपाळ सतीश यांनी आदर्शवत खेळ केला. कर्णधार फैझ फझलने ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्यामुळे अक्षय वाडकरसारख्या युवा खेळाडूंनी प्रेरणा घेतली,’’ असे पंडित यांनी सांगितले.