अपंगांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील गैरव्यवस्थेबाबत दोषी ठरवत भारतीय पॅराऑलिम्पिक समितीने अध्यक्ष राजेश तोमर यांचीच पदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप ठेवण्यात आले आहेत. समितीच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
समितीचे सरचिटणीस जे. चंद्रशेखर यांनी सांगितले की, ‘‘गाझियाबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना अतिशय गैरव्यवस्थेला सामोरे जावे लागले. अनेक खेळाडू व संघटकांनी या गैरव्यवस्थेबद्दल केंद्र शासनाकडे तक्रार केली. या तक्रारीबाबत गांभीर्याने विचार करीत समितीने तोमर यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. तोमर यांच्यावर २०१४च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या वेळी आर्थिक गैरव्यवहार व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी समितीने दिल्ली उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समितीही नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
चंद्रशेखर यांनी सांगितले की, ‘‘ राष्ट्रीय स्पर्धेतील गैरव्यवस्थेबद्दल तोमर यांना अधिकार नसूनही त्यांनी पाच अधिकाऱ्यांना बडतर्फ केले व चौकशी समिती स्थापन केली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी गाझियाबाद येथे चांगल्या व्यवस्था आहेत की नाही याची पाहणी न करताच तोमर यांनी तेथे स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी दिली. या स्पर्धेच्या वेळी ते स्वत: फारच कमी वेळ उपस्थित होते. गैरव्यवस्थेची जबाबदारी स्वत:कडे न घेता त्यांनी अन्य लोकांनाच जबाबदार धरले.’’