भारतीय संघातून सध्या बाहेर असलेल्या पार्थिव पटेलने, आपला सहकारी वृद्धीमान साहाचं कौतुक केलं आहे. सध्याच्या घडीला साहा जगातला सर्वोत्तम यष्टीरक्षक असल्याचं पार्थिव पटेलने म्हटलंय. पार्थिव सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळतो आहे.

पार्श्वभूमी –

वर्षभरापूर्वी वृद्धीमान साहा आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र यामधून सावरुन त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं. २०१९ विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यात त्याला संधी मिळाली नाही. मात्र, पंतच्या खराब कामगिरीनंतर भारतीय निवड समितीने कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वृद्धीमान साहाच्या अनुभवाला पसंती दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर साहाने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.

यानंतर साहाने यष्टींमागे सुरेख कामगिरी करत आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात साहाने सुरेख झेलही पकडले.

काय म्हणाला पार्थिव पटेल??

“सध्याच्या घडीला वृद्धीमान जगातला सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याचं तंत्र, यष्टीरक्षणाची शैली, यष्टींमागे झेल घेताना त्याच्यातली उर्जा या सर्व गोष्टींमुळे तो वेगळा ठरतो. त्यामुळे सध्याच्या घडीला तो सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे यात काहीच शंका नाही. मी अनेकदा त्याच्यासोबत सराव केला आहे, खेळाप्रती असणारी त्याची निष्ठा आणि मेहनत या गोष्टी खरचं घेण्यासारख्या आहेत”, पार्थिव इडन गार्डन्स मैदानाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होता.

भारत अ संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी साहाची निवड झालेली आहे. त्याआधी साहा NCA (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) मध्ये आपला फिटनेस कायम राखण्यावर मेहनत घेणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे, या दौऱ्यात कसोटी मालिकेतून साहा पुन्हा मैदानात उतरेल.