12 December 2017

News Flash

मुंबईचा इरादा पक्का..!

* कर्णधार पार्थिव पटेलचे झुंजार शतक * मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातचा डाव फक्त २४४ धावांत गुंडाळला *

प्रशांत केणी, मुंबई | Updated: December 30, 2012 1:03 AM

* कर्णधार पार्थिव पटेलचे झुंजार शतक
* मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातचा डाव फक्त २४४ धावांत गुंडाळला
* फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणचे ५४ धावांत ३ बळीं
‘खडूस संघ’ अशी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईची खास ओळख आहे. रणजी साखळीतील अखेरच्या दोन लढती शिल्लक असताना मुंबईचे बाद फेरीतील भवितव्य अधांतरी होते. पण इंदूरमध्ये मुंबईने कात टाकली. झहीर खानच्या ‘झहरील्या’ माऱ्याच्या बळावर मुंबईने मध्य प्रदेशवर निर्णायक विजय मिळवत सहा गुण कमविले. उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे मुंबईचे मनोधर्य पक्के होते. रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अ गटातील अखेरच्या सामन्यात गाठ पडली आहे गुजरातशी आणि मिळवायचे आहेत किमान पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर कौटुंबिक सुटीवर असल्याने अनुपलब्ध, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे भारतीय संघासाठी व्यस्त, तर दुखापतीमुळे अजित आगरकरची माघार ही सारी संकटे मुंबईच्या समोर येऊन ठेपली. पण मुंबईचा संघ खचला नाही. पहिल्याच दिवशी मुंबईने गुजरातचा पहिला डाव फक्त २४४ धावांत गुंडाळला आणि दिवसअखेर १ बाद २४ अशी मजल मारत आपले निर्णायक विजयाचे मनसुबे प्रकट केले. तथापि, गुजरातचा संघनायक पार्थिव पटेलने संयमी आणि झुंजार फलंदाजीचे दर्शन घडविताना दमदार शतक नोंदवत सर्वाचे लक्ष वेधले.
आगरकरच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या झहीरने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि समित पटेलला तंबूची वाट दाखवत गुजरातला पहिला दणका दिला. त्यानंतर समित गोहेल (३०) आणि भार्गव मिरई (४१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर भारताकडून खेळण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या पार्थिवने दिमाखात फलंदाजी केली. मुंबईचे गोलंदाज गुजरातच्या एकेक फलंदाजाला माघारी पाठवत असतानाही पार्थिव डगमगला नाही. चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर त्याने १४६ चेंडूंचा सामना करीत १२ चौकारांच्या साहाय्याने १०१ धावांची खेळी साकारली. या खेळीमुळे पार्थिवने यंदाच्या रणजी हंगामात ८०० धावांचा टप्पा ओलांडला आणि रवींद्र जडेजाला मागे टाकून तो सर्वाधिक धावांच्या पंक्तीत आघाडीवर पोहोचला आहे. यंदाच्या हंगामात सुटलेल्या झेलमुळे मुंबईचे अतिशय नुकसान झाले आहे. शनिवारी धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये हिकेन शहाने पार्थिवला ६४ धावांवर जीवदान दिले आणि तेच मुंबईला महागात पडले. त्यानंतर जावेद खानने पार्थिवचा अडसर दूर केला. डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणने ५४ धावांत ३ बळी घेतले, तर जावेद आणि झहीर या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
त्यानंतर मुंबईने गुजरातच्या गोलंदाजांनी दिवसअखेर कौस्तुभ पवारला (१७) बाद करण्यात यश मिळवले. मुंबई अद्याप २२० धावांनी पिछाडीवर असून, रविवारीच मुंबई आपल्या खात्यावर तीन गुण निश्चित करण्याची शक्यता आहे.
संक्षिप्त धावफलक
गुजरात (पहिला डाव) : ७८.२ षटकांत सर्व बाद २४४ (समित गोहेल ३०, भार्गव मिरई ४१, पार्थिव पटेल १०१; झहीर खान २/४०, जावेद खान २/४६, अंकित चव्हाण ३/५४)
मुंबई (पहिला डाव) : ८.३ षटकांत १ बाद २४ (कौस्तुभ पवार १७; राकेश ध्रुव ५/१)    
भारताकडून खेळण्याच्या प्रेरणेमुळेच धावा झाल्या -पार्थिव पटेल
भारताकडून खेळण्याच्या आंतरिक प्रेरणेमुळेच माझ्याकडून धावा होत आहेत, असे गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल याने सामन्यानंतर सांगितले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या पार्थिवने यंदाच्या रणजी हंगामात आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणे, हे कठीण आव्हान होते. परंतु प्रारंभी संघाची फलंदाजी पाहता मला गुजरात साडेतीनशेपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली, असे पार्थिव पुढे म्हणाला.

First Published on December 30, 2012 1:03 am

Web Title: patels century saves gujarat blushes zaheer takes two