बहुचर्चित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाची माळ केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या गळ्यात बिनविरोध पडणार हे आता स्पष्ट झाले आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अर्ज भरला होता. मात्र शनिवारी झालेल्या वैधता चाचणीत मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
मुंडे यांचा अर्ज कायमस्वरुपी वास्तव्याच्या तांत्रिक कारणास्तव निवडणुक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. परंतु ते या निर्णयाविरोधात दाद मागू शकतात अशी माहिती एमसीएचे विद्यमान अध्यक्ष रवी सावंत यांनी दिली. उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यामुळे नाराज मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, १९८६ पासून मी मुंबईचा रहिवासी आहे. माझ्या पासपोर्टवर मुंबईचा पत्ता आहे. कर परतावा कागदपत्रांवरही मुंबईचा पत्ता आहे. असे असतानाही माझा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले.
एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ इच्छिणारा उमेदवार मुंबईचा रहिवासी असणे अनिवार्य असते. मात्र मुंडे तांत्रिकदृष्टय़ा मुंबईचे रहिवासी असल्याचे स्पष्ट होत नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवला गेला. अध्यक्षपदासाठी तीन गटांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. मात्र मुंडेंनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने महाराष्ट्रातील या दोन मातब्बर नेत्यांमध्ये थेट मुकाबला रंगण्याची चिन्हे होती. मात्र आता मुंडेंचा अर्ज बाद झाल्याने पवारांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुलै २०११ मध्ये झालेल्या एमसीएच्या निवडणुकीप्रसंगी पत्याच्या तांत्रिक कारणास्तव पवारांना निवडणुक लढवता आली नव्हती. त्यावेळी त्यांनी विलासराव देशमुख यांना पाठिंबा दिला होता. देशमुखांचीच अध्यक्षपदी निवड झाली होती.
एमसीए निवडणुकीत १७ जागांसाठी ६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मुंडे यांचा अपवाद वगळता अन्य ६१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.