भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांत दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा समावेश असून ज्यांचे गोलंदाज सातत्याने दमदार कामगिरी करतील, तोच संघ संपूर्ण दौऱ्यात वर्चस्व गाजवेल, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केली.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० लढती खेळण्याबरोबरच उभय संघांत चार कसोटी सामन्यांची मालिकाही रंगणार आहे. भारताकडे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, तर ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांच्या रूपात प्रतिभावान वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे या दौऱ्यात गोलंदाजांचे द्वंद्व पाहायला मिळेल, असे ४२ वर्षीय झहीरला वाटते.

‘‘ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर वेगवान गोलंदाजांचे नेहमीच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्याशिवाय गेल्या काही वर्षांत भारताच्या वेगवान गोलंदाजांची फळी ऑस्ट्रेलियाच्या तोडीची झाली आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये ज्या वेगवान गोलंदाजांचे आपण नाव घेतो, त्यातीलच काही चेहरे आपल्याला संपूर्ण मालिकेदरम्यान खेळताना दिसतील. त्यामुळे ज्या संघांचे वेगवान गोलंदाज छाप पाडतील, तोच संघ मालिका विजयाचा प्रबळ दावेदार असेल,’’ असे झहीर म्हणाला.

‘‘विशेषत: कसोटी मालिकेत बुमरा, शमी, इशांत शर्मा आणि स्टार्क, कमिन्स, जोश हेझलवूड यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यांच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबूशेन या आघाडीच्या फलंदाजांविरुद्ध भारताच्या वेगवान त्रिकुटाची कामगिरी निर्णायक ठरेल,’’ असेही झहीरने सांगितले.

भारताला तिन्ही मालिका विजयाची संधी -लक्ष्मण

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला एकदिवसीय, ट्वेन्टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याची नामी संधी आहे, असे मत माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केले. ‘‘सध्याच्या भारतीय संघात प्रत्येक क्रमांकासाठी योग्य खेळाडू उपलब्ध आहे. तिन्ही प्रकारच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा उत्तम ताळमेळ साधल्यास भारताला यंदा नमवणे ऑस्ट्रेलियासाठी फार कठीण जाईल,’’ असे लक्ष्मण म्हणाला.

दोन कर्णधार आपल्या संस्कृतीत नाही -कपिल

एका कंपनीत जसे दोन मुख्य कार्यकारी अधिकारी असू शकत नाहीत, तसेच दोन कर्णधार भारतीय क्रिकेटच्या संस्कृतीत बसत नाहीत, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार स्वीकारणे शक्य नाही. विराट कोहली क्रिकेटच्या एका प्रकारात उत्तम नेतृत्व सांभाळत असेल तर त्याच्याकडेच कर्णधारपद सोपवायला हवे. भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघात जवळपास ७० टक्के खेळाडू सारखेच आहेत. त्यामुळे विविध कर्णधारांच्या विविध रणनीतीसह खेळायला त्यांना आवडणार नाही.’’