‘आयपीएल’च्या या हंगामात खेळाडूंच्या लिलावावेळी संघात उत्तम गोलंदाजांचा समावेश करण्याचीबाब आमच्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’ ठरली असल्याचे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने म्हटले आहे. या हंगामाचे जेतेपद प्राप्त केल्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत गौतम बोलत होता.
गौतम गंभीर म्हणाला की, “खेळाडूंच्या लिलावावेळी संघात उत्तम गोलंदाज समाविष्ट करण्यावर भर देण्याची बाब आमच्यासाठी महत्वाची ठरली. ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बहुतेक संघ आपल्याकडे चांगली फलंदाजी बाजू असावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात परंतु, उत्तम गोलंदाजी असणारी बाजू फलंदाजांना थोपवून ठेवण्यास मदत करते आणि ट्वेन्टी-२० मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येवर आळा घालणे हाच मुख्य उद्देश असल्यामुळे संघात उत्तम गोलंदाज असणे ही तितकीच महत्वाचीबाब आहे. त्यामुळे उत्तम गोलंदाज समाविष्ट करण्याची युक्ती यशस्वी झाली. पण, आमची फलंदाजीही त्याच पद्धतीने उल्लेखनीय होती.” असेही गंभीर म्हणाला.
फोटो गॅलरी: सत्ताधीश!
‘आयपीएल’चे २०१२ सालचे आणि यावेळीचे जेतेपद या दोघांमधील कोणते जेतेपद महत्वाचे वाटते असे विचारले असता गौतमने अशी तुलना करणे कठीण असल्याचे म्हटले परंतु, त्यामानाने यावेळीचे जेतेपद खास असल्याकडे कल असल्याचेही त्याने व्यक्त केले. कारण, या हंगामाच्या पहिल्या सात सामन्यांकडे पाहता संघ जेतेपद गाठेल याची कोणालाही शाश्वती नव्हती परंतु, हार न पत्करता त्यानंतरच्या नऊ विजयी सामन्यांमधून संघातील प्रत्येकाने आपले कसब दाखवून दिले. स्पर्धेच्या मध्यावर आम्ही गुणतालिकेत सातव्या स्थानी होतो तेथून विजयी मालिका सुरू करून आम्ही थेट अंतिम फेरी गाठली. त्यासाठी संघातील प्रत्येकाने महत्वपूर्ण योगदान दिले. यावर भरपूर खूश असल्याचेही गंभीर म्हणाला.