भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि क्युरेटर प्रबिर मुखर्जी यांचा खेळपट्टीवरून झालेला नाटय़मय वाद चांगलाच रंगला होता. ती कसोटी भारताने गमावली, इतकेच नव्हे तर मालिकाही. पण आता नवा प्रतिस्पर्धी पाकिस्तान समोर आहे आणि पुन्हा धोनी प्रबिर यांच्या व्यासपीठावर विजयाच्या ईष्रेने आला आहे; परंतु गुरुवारी भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा दुसरा एकदिवसीय सामना हा प्रबिर मुखर्जी यांचा ईडन गार्डन्सचे क्युरेटर म्हणून अखेरचा सामना असण्याची शक्यता आहे. परंतु जिवंत असेपर्यंत मी या मैदानाशी एकनिष्ठ राहीन, असे मत ८३ वर्षीय मुखर्जी यांनी प्रकट केले आहे.
‘‘प्रकृती परवानगी देईल तोपर्यंत मी इथे असेन आणि मी जगतोय,’’ अशी प्रतिक्रिया मुखर्जी यांनी व्यक्त केली. एकदिवसीय सामन्याला सामोरे जाताना मात्र मुखर्जी यांच्यावर कोणतेही दडपण नाही. फलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘एकदिवसीय सामन्यांसाठी आयसीसीने खेळपट्टीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत, त्यांचे पालन करण्यात आले आहे. कारण एकदिवसीय क्रिकेट हे फलंदाजांसाठी विशेष ओळखले जाते. या खेळपट्टीवर फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकतील,’’ असे मुखर्जी यांनी सांगितले.