पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचेही पत्राद्वारे कौतुक केले आहे.

‘‘रैना, निवृत्ती हा शब्द वापरण्यासाठी अजून तू खूप लहान आहेस आणि तंदुरुस्त आहेस. तुझ्या क्रिकेट कारकीर्दीत अनेकवेळा यश-अपयश तू पाहिले आहेस. मात्र प्रत्येक आव्हान समर्थपणे हाताळलेस. तुझी २०११ विश्वचषकातील अहमदाबाद येथील ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत केलेली खेळी आजही माझ्या लक्षात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात तुझे मोठे योगदान होते, हे मी स्वत: स्टेडियममध्ये बसून पाहिले होते,’’ असे पंतप्रधानांनी रैनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘‘ट्वेन्टी-२० मध्ये चपळता आणि वेगवान क्रिकेट यांना महत्त्व असते. हे दोन्ही गुण सहज अवगत केल्याने रैना तुला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये यश मिळवता आले. वैयक्तिक कामगिरीचा विचार न करता नेहमीच संघाचा विचार करून खेळ करण्याला प्राधान्य दिलेस. क्षेत्ररक्षणातील तुझे असणारे कौशल्यदेखील वाखाणण्याजोगे आहे,’’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

रैनाकडून पंतप्रधानांचे आभार

‘‘देशासाठी खेळताना आपण घाम गाळत असतो. देशाच्या पंतप्रधानांकडून याप्रकारे माझे कौतुक व्हावे ही फार मोठी अभिमानास्पद बाब आहे. या कौतुकाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो,’’ असे म्हणन रैनाने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.