प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात हरयाणा स्टिलर्सचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात यू मुम्बाने हरयाणा स्टिलर्सवर ४६-३८ ने मात केली. यू मुम्बाकडून अभिषेक सिंहने चढाईत १६ तर अर्जुन देशवालने १५ गुणांची कमाई केली. हरयाणा स्टिलर्सच्या बचावफळीचं अपयश हे त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.

पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळ करणाऱ्या यू मुम्बाने सामन्यात आघाडी घेतली होती. हरयाणा स्टिलर्सच्या कमकुवत बचावफळीचा फायदा घेत मुम्बाच्या खेळाडूंनी खोऱ्याने गुण वसूल केले. ज्यामुळे यू मुम्बाने फार कमी वेळेत मोठी आघाडी घेतली. हरयाणाकडून विकास कंडोला आणि प्रशांत कुमार राय यांनी चढाईत एकत्र मिळून २२ गुणांची कमाई केली. मात्र दुर्दैवाने त्यांना इतर खेळाडूंची साथ लाभली नाही.

दुसरीकडे यू मुम्बाच्या खेळाडूंनी मात्र अष्टपैलू खेळ केला. चढाईत अभिषेक आणि अर्जुनने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याला बचावफळीत कर्णधार फजल अत्राचली, सुरिंदर सिंह, संदीप नरवाल यांनी महत्वाच्या पकडी करत चांगली साथ दिली. ज्यामुळे अखेरच्या सत्रापर्यंत यू मुम्बाचा संघ सामन्यात आपली आघाडी टिकवून होता. अखेरच्या मिनीटांमध्ये हरयाणा स्टिलर्सने प्रतिकार करणं सोडूत देत हार मानली होती. यू मुम्बासमोर उपांत्य फेरीत बंगाल वॉरियर्सचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 Eliminator 1 : बंगळुरुच्या विजयात पवन शेरावत चमकला, यूपी योद्धाचं आव्हान संपुष्टात