देशातील दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय लीग असा दर्जा प्राप्त करणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामाचे प्रक्षेपणाचे हक्क लिलाव प्रक्रियेद्वारे ठरण्याची दाट शक्यता आहे. सध्याचे प्रक्षेपणकर्ते स्टार इंडिया यांच्या महसूल वाटपाच्या प्रस्तावामुळे संघ आणि संयोजक मशाल स्पोर्ट्स पेचात सापडले आहेत.

स्टार इंडियाने यापेक्षा उत्तम प्रस्ताव ठेवला नाही, तर प्रक्षेपणाचे हक्क पारदर्शक लिलाव पद्धतीने निश्चित व्हावे, यासाठी सर्व संघमालकांनी एकत्रित येऊन मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

इंडियन प्रीमियर लीगप्रमाणे प्रो कबड्डी लीगचा लिलाव व्हावा. ते स्टार इंडियाला थेट देऊ नये, अशी मागणी आम्ही मशाल स्पोर्ट्सकडे केली आहे. प्रो कबड्डी लीगचे बाजारमूल्य उत्तम आहे. स्टारच्या मशाल स्पोर्ट्समधील भागीदारीत हितसंबंध दडले आहेत.

स्टार इंडियाने सर्व संघमालकांपुढे पुढील पाच वर्षांसाठी प्रक्षेपणाच्या हक्काच्या नफ्याद्वारे प्रत्येकी १४—१५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु संघामालकांना प्रति वर्षांसाठी किमान २२ कोटी रुपये अपेक्षित आहे. स्टार इंडिया प्रक्षेपणाचे हक्क लिलावात जाऊ देणार नाही, असे काही संघमालकांचे म्हणणे आहे.

२०१५मध्ये पहिल्या प्रो कबड्डी लीगच्या यशानंतर स्टार इंडियाने मशाल स्पोर्ट्सचा ७४ टक्के हिस्सेदारी मिळवला आणि स्पर्धेवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले. कबड्डीला टेलिव्हिजनवरील खेळ म्हणून कुणीच विचार करीत नसताना स्टार इंडियाने त्यात गुंतवणूक केली होती. आनंद महिंद्रा आणि चारू शर्मा यांनी १९९४मध्ये मशाल स्पोर्ट्सची स्थापना केली होती. परंतु प्रक्षेपण कंपनीला कबड्डीचे मूल्य पटवून द्यायला त्यांना दोन दशके लागली. २०१४मध्ये स्टार इंडियाने कबड्डी क्रीडा प्रकारात रस घेतल्याने पहिल्या प्रो कबड्डी पर्वाला प्रारंभ झाला. स्टारनेच प्रो कबड्डीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.

यासंदर्भात तेलुगू टायटन्स संघाचे मालक श्रीनिवास श्रीरामाणी म्हणाले की, स्टार आमच्याकडे चांगला प्रस्ताव ठेवेल, अशी अपेक्षा आहे. हा प्रस्ताव सर्वांना मान्य नसेल, तर आम्ही लिलावाद्वारे प्रक्षेपणाचे हक्क ठरवू.

प्रो कबड्डीचे तीनदा विजेतेपद मिळवणाऱ्या पाटणा पायरेट्स संघाचे मालक राजेश शहा यांनी सांगितले की, प्रो कबड्डीच्या प्रक्षेपण हक्काची प्रक्रिया सर्व संघ आणि मशाल स्पोर्ट्स यांच्यात झालेल्या करारानुसार निश्चित करण्यात येईल.