प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात फॉर्मात असलेल्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. जसवीर सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स संघाने गुजरातवर ३१-२५ अशी मात केली. सुरुवातीच्या सत्रात पिछाडी भरुन काढत जयपूरच्या संघाने गुजरातला बॅकफूटवर ढकललं. यानंतर गुजरातचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही.

मनजीत छिल्लरच्या अनुपस्थिती खेळणाऱ्या जसवीरने आज चढाईत ६ गुण मिळवले. त्याला पवन कुमारने ४ तर नितीन रावलने २ गुण मिळवत चांगली साथ दिली. जसवीर आणि पवन कुमारने गुजरातच्या बचावफळीतल्या दोन्ही इराणी खेळाडूंवर हल्ला करत गुजरातला धक्का दिला. यानंतर गुजरातची बचावफळी आपल्या लयीत दिसलीच नाही. ज्याचा जयपूरने पुरेपूर फायदा उचलला.

गुजरातकडून आज कोणत्याही खेळाडूने कामगिरीत सातत्य दाखवलं नाही. एरवी गुजरातसाठी हुकुमाचा एक्का मानला जाणारा सचिनही आज सामन्यात ७ गुण मिळवू शकला. मात्र हे ७ गुण दोन सत्रांमध्ये मिळून मिळवले गेले होते. सुकेश हेगडे, पवन शेरावत, महेंद्र राजपूत यांनी काही चांगले गुण मिळवत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र जयपूरच्या बचावफळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

बचावफळीतही गुजरातच्या फैजल अत्राचलीला फारशी चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. अबुझर मेघानीने सामन्यात काही चांगल्या पकडी केल्या, मात्र त्याला इतर बचावपटूंकडून हवीतशी साथ मिळाली नाही. त्यामुळे गुजरातला सामन्यात परतण शक्यच झालं नाही. या पराभवानंतही गुजरात गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम असून, जयपूर पिंक पँथर्सने मात्र तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये ही स्पर्धा अधिकच चुरशीची होणार यात शंका नाही.