प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाच्या लिलावाआधीच, महाराष्ट्राचा अनुभवी कबड्डीपटू आणि दबंग दिल्लीचा माजी कर्णधार निलेश शिंदे याला संभाव्य खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. मुंबईत ३० आणि ३१ मे रोजी प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव पार पडला जाणार आहे. यावेळी निलेश शिंदेला लिलावातून वगळण्याची बातमी समोर आली.

सहाव्या हंगामासाठी निलेशचा ब गटात समावेश करण्यात आला होता. निलेश सोबत अर्जुन सिंह चौधरी आणि गोविंद पनवार या खेळाडूंनाही वगळण्यात आलेलं आहे. निलेश शिंदेला वगळण्यामागे आयोजकांकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत कारण देण्यात आलेलं नाहीये. मात्र काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका स्थानिक स्पर्धेत मारामारी केल्याप्रकरणी निलेश शिंदेवर गुन्हा दाखल झाला होता. याच कारणासाठी निलेशचं नाव वगळलं गेल्याची चर्चा सध्या क्रीडा वर्तुळात सुरु आहे.