शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने एका गुणाने बाजी मारत तामिळ थलायवाजचा पराभव केला आहे. बचावपटूंनी गाजवलेल्या सामन्यात पाटण्याने तामिळ थलायवाजवर २४-२३ अशी मात केली. पाटण्याकडून जयदीपने चढाईत सर्वाधिक ७ गुण कमावले, त्याला मोनूने ५ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली.

दोन्ही संघांमधलं सत्र अतिशय अटीतटीचं ठरलं. दोन्ही संघातील चढाईपटूंपेक्षा बचावपटूंनी सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे, मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ ११-११ अशा बरोबरीत होते. पाटणा पायरेट्सचा अनुभवी चढाईपटू प्रदीप नरवालला पहिल्या सत्रात चढाईमध्ये, तामिळ थलायवाजच्या बचावपटूंनी एकही गुण कमावून दिला नाही. प्रत्येक चढाईमध्ये प्रदीप नरवाल तामिळ थलायवाजच्या बचावपटूंचा शिकार ठरला. प्रदीपसोबत कोरियन चढाईपटू जँग कून ली देखील आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. पहिल्या सत्रात त्याची पाटीही कोरीच राहिली. अखेरीस मोहम्मद मग्शदुलू, हादी ओश्तनोक, जयदीप या खेळाडूंनी बचावफळीत गुणांची कमाई करत पाटण्याचं पहिल्या सत्रात आव्हान कायम राखलं.

तुलनेत तामिळ थलायवाजच्या संघाने पहिल्या सत्रात आश्वासक खेळ केला. चढाईपटूंना पहिल्या सत्रात केवळ ४ गुणांची कमाई करता आली, मात्र बचावफळीने आपलं काम चोख बजावलं. राहुल चौधरी आज फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. सुरुवातीच्या मिनीटांमध्ये पिछाडीवर पडलेल्या पाटण्याच्या बचावपटूंनी, राहुल चौधरीला लक्ष्य करत आपलं आव्हान कायम राखलं. दोन-तीन वेळा पाटण्याचा संघ सामन्यात ऑलआऊट व्हायला आला होता, मात्र बचावपटूंच्या भक्कम कामगिरीमुळे पाटण्याने ही नामुष्की टाळली.

दुसऱ्या सत्रामध्येही दोन्ही संघामधलं द्वंद्व अतिशय अटीतटीचं सुरु होतं. पहिल्या ७ मिनीटांच्या खेळानंतर पाटण्याने सामन्यात एका गुणाची आघाडी घेतली. तामिळ थलायवाजच्या अजय ठाकूरने चढाईदरम्यान काही क्षुल्लक गुण बहाल केले. दुसरीकडे पाटणा पायरेट्सच्या बचावपटूंनी आपला धडाका कामय ठेवला होता. मनजीत छिल्लर, रण सिंह यासारख्या बचावपटूंना माघारी धाडत पाटण्याच्या खेळाडूंनी मोठी आघाडी घेतली. मात्र राहुल चौधरीने तामिळ थलायवाजकडून आपल्या अनुभवाचा फायदा घेत, एका चढाईत दोन गुणांची कमाई करत पिछाडी भरुन काढली. पाटणा पायरेट्सकडून दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या मोनूने बचावफळीत आपलं नाणं खणखणीत वाजवलं.

दुसऱ्या सत्रात मोनूने राहुल चौधरी, अजय ठाकूर सारख्या मातब्बर खेळाडूंच्या पकडी करत, ५ गुण कमावले. पाटणा पायरेट्सच्या या आक्रमक खेळामुळे तामिळ थलायवाजचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. बचावफळीत मोहीत छिल्लरने पाटण्याला सोपा गूण बहाल करत तामिळच्या गोटातली चिंता वाढवली. कर्णधार अजय ठाकूरही करो या मरोच्या चढाईमध्ये माघारी परतला. याचसोबत मोक्याच्या क्षणी मोनूने चढाईत महत्वाचे गुण मिळवत पाटण्याची आघाडी वाढवली. आपले बचावपटू करत असलेली चांगली कामगिरी पाहून पाटण्याच्या प्रदीप नरवालने चढाईत पहिल्या गुणाची कमाई केली. मात्र तामिळ थलायवाजच्या संघानेही आपली झुंज कायम ठेवली होती. शेवटच्या मिनीटापर्यंत पाटणा पायरेट्स संघाकडे २ गुणांची आघाडी होती. मात्र झटपट गुण कमावण्याच्या नादात राहुल चौधरीने लॉबी क्षेत्रात पाय ठेवत सामना पाटण्याला बहाल केला. अखेरीस २४-२३ च्या फरकाने पाटण्याने सामन्यात बाजी मारली.