पुलवामा सेक्टरमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) पथकावर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. अनेक सामाजिक संस्था, सेलिब्रिटी, खेळाडू यांनी आपापल्या परीने या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला आर्थिक व इतर मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे. तसेच हल्ल्याचा निषेध केला आहे.

या साऱ्या गोष्टींमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा ही काय मत व्यक्त करते असा प्रश्न विचारला जात होता. त्यानुसार सानिया मिर्झाने पुलवामा हल्ल्यानंतर या घटनेबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक संदेश लिहिला.

माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा निषेधासाठी मला सोशल मीडियाची गरज नाही, अशी पोस्ट तिने केली होती. मात्र या नंतरही तिला ट्रोल करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे तिच्या निषेधाच्या पत्रात कुठेही पाकिस्तानचा उल्लेख नाही. अनेकांनी तिला यावरून पुन्हा सवाल केले.

दरम्यान, या आधीदेखील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अनेक मुद्द्यावरून सानिया मिर्झा ट्रोल झाली आहे.