एकेरीतील शानदार विजयासह पुणे जिल्हा संघाने सेलो चषक महाराष्ट्र बॅडमिंटन लीगमध्ये अजिंक्यपद मिळविले. त्यांनी उत्कंठापूर्ण अंतिम लढतीत मुंबई उपनगर संघास ३-१ असे हरविले.
मॉडर्न क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत शुभंकर डे व नेहा पंडित हे पुण्याच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पहिली गेम गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत शुभंकर याने मुंबईचा आंतरराष्ट्रीय खेळाडू कौशल धर्मामेर याला हरविले. चुरशीचा हा सामना शुभंकर याने १६-२१, २१-११, ११-९ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी क्रॉसकोर्ट फटके व स्मॅशिंगचा बहारदार खेळ याचा प्रत्यय घडविला. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे शुभंकर याला मानसिक फायदा मिळाला. निर्णायक गेममध्ये ३-७ अशी पिछाडी असताना सामन्याचे पारडे कौशलच्या बाजूने झुकले होते तथापि कौशलने दिलेल्या नकारात्मक गुणांचा फायदा घेत शुभंकर याने पिछाडी भरून काढली. ही गेम घेत विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याने आपला जर्सी हवेत उंचावत आनंद व्यक्त केला.
महिलांच्या एकेरीत नेहा हिने सायली राणे हिच्यावर २१-१६, २१-१४ अशी मात केली. दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग केला. नेहा हिने नेटजवळून प्लेसिंगचा उपयोग करीत हा सामना जिंकला व पुण्यास २-० अशी आघाडी मिळवून दिली. पुरुषांच्या दुहेरीत मात्र पुण्याच्या वरुण खानवलकर व सुधांशु मेडसीकर यांना मुंबईच्या श्लोक रामचंद्रन व चिराग शेट्टी यांच्याकडून १२-२१, १०-२१ असा दारुण पराभव पत्करावा लागला. हा सामना घेत मुंबईने सामन्यातील उत्कंठा वाढविली.
या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या निशाद द्रवीड व मानसी गाडगीळ या पुण्याच्या जोडीने मिश्र दुहेरीत विजय मिळविला. मात्र त्यासाठी त्यांना प्रसाद शेट्टी व रिया पिल्ले यांच्याविरुद्ध झगडावे लागले. हा सामना पुण्याच्या जोडीने २१-१६, १५-२१, ११-५ असा जिंकला व विजेतेपद खेचून आणले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक विमलकुमार यांच्या हस्ते झाला.