पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत काळाचौकीतील अभ्युदयनगरमध्ये रंगलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात विजेतेपदाचा मान पटकावला. राजमाता जिजाऊ संघाने पुण्याच्याच सुवर्णयुग संघावर २५-१९ अशी मात करून जेतेपदाला गवसणी घातली.
मध्यंतराला ११-८ अशी आघाडी घेणाऱ्या राजमाता जिजाऊने उत्तरार्धात अधिक आक्रमक खेळ तसेच सुरेख क्षेत्ररक्षण करून ही आघाडी वाढवत नेली. सुवर्णयुगची आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफने आपल्या संघाचा पराभव टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. पण शेवटी तिला अपयश आले. राजमाताच्या स्नेहल शिंदेने अष्टपैलू खेळाची चमक दाखवत विजयात मोलाचा वाटा उचलला. तिला स्नेहल एम. शिंदे हिने उत्कृष्ट चढाया करत चांगली साथ दिली. सायली कैरीपालेने सफाईदार पकडी करत कबड्डीप्रेमींची वाहवा मिळवली. सुवर्णयुगकडून संगीता ऐनपुरे आणि सोनाली इंगळेने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. या विजयासह राजमाता जिजाऊने दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. सुवर्णयुग संघाला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
सुवर्णयुगने सुरुवातीलाच आघाडी घेत चांगली सुरुवात केली. पण ६-६ अशा बरोबरीनंतर राजमाताने दोन गुण मिळवले. त्यानंतर हीच आघाडी कायम ठेवत त्यांनी गुण वसूल केले. दोन्ही संघांनी प्रेक्षणीय खेळ करून कबड्डीचाहत्यांची मने जिंकली.
दरम्यान पुरुष गटात भारत पेट्रोलियम आणि दक्षिण पूर्व रेल्वे या संघांमध्ये अंतिम मुकाबला रंगणार आहे. भारत पेट्रोलियमने उपांत्य फेरीच्या लढतीत एअर इंडियावर ९-८ अशी निसटती मात केली. पेट्रोलियमतर्फे सुरजित सिंग, रिशांक देवाडिगा यांनी तुफानी चढाया केल्या तर विशाल मानेने सफाईदार पकडी केल्या. दुसऱ्या लढतीत दक्षिण पूर्व रेल्वेने महिंद्रा संघावर २२-१४ अशी मात केली. मध्यंतराला रेल्वे संघाने ७-४ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी वाढवत त्यांनी विजय साकारला. रेल्वेतर्फे प्रमोद, श्रीकांत यांनी शानदार चढाया केल्या.